Fuel during Diwali: दिवाळीत इंधन पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता
Fuel during Diwali:

पेट्रोल-डीलर्स असोसिएशनकडून चिंता व्यक्त
Fuel during Diwali: दिवाळी आणि आगामी सणासुदीच्या सुट्यांमध्ये शहरात इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुणे (पीडीएपी) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) संथ इंधन पुरवठ्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. डीलर्सनी आवश्यक तो निधी आगाऊ जमा करूनही अनेक पेट्रोल पंपांना पेट्रोल आणि डिझेलचे लोड वेळेवर मिळत नसल्याचे असोसिएशनने पत्रकाद्वारे सांगितले.
बीपीसीएलचे डेपो लवकर बंद होणे आणि इंधन लोडिंगला होणारा विलंब यामुळे डीलर्सना प्रतीक्षा करावी लागत आहे. आगामी काळात सलग बँक आणि सणांच्या सुट्या येत असल्याने ही पुरवठ्याची परिस्थिती बिघडू शकते. त्यामुळे ऐन सणासुदीत काही पेट्रोल पंपांवरील इंधनसाठा संपण्याची शक्यता आहे.
या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत पीडीएपीचे अध्यक्ष ध्रुव रूपारेल म्हणाले की, डीलर्सनी आगाऊ पैसे भरूनही वेळेवर माल न मिळणे ही स्थिती निर्माण होऊ लागली आहे. Fuel during Diwali:
आगामी सुट्यांच्या काळात नागरिकांना फटका बसू नये, यासाठी बीपीसीएलने तातडीने उपाययोजना कराव्यात. प्रलंबित इंडेंट वेळेत पूर्ण करण्यासाठी पुण्यातील बीपीसीएलचे सर्व डेपो रविवारीही सुरू ठेवून इंधनाचे लोडिंग करणे अनिवार्य आहे.
असोसिएशनने पेट्रोल (एमएस) आणि डिझेलचा (एचएसडी) पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत डेपोच्या कामकाजाची वेळ वाढवून सुट्यांच्या दिवशीही काम सुरू ठेवावे, जेणेकरून ग्राहकांना अखंडित इंधनपुरवठा मिळेल, असे आवाहनही करण्यात आले आहे.





