‘Vande Mataram’: शनिवारवाड्यात ३८ हजार २३३ पणत्या प्रज्वलित
'Vande Mataram':

पुणे पालिकेच्या सोहळ्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
‘Vande Mataram’: वंदे मातरम् च्या शताब्दी वर्षानिमित्त पुणे महानगरपालिकेने ऐतिहासिक शनिवारवाड्यावर आयोजित केलेल्या दीपप्रज्वलन सोहळ्यात ३८ हजार २३३ पणत्या प्रज्वलित करून जागतिक विक्रमाची नोंद केली. या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाली असून, पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सन्मान राष्ट्रगीताचा, अभिमान पुणेकरांचा, या प्रेरणादायी संकल्पनेतून आयोजित केलेल्या कार्यक्रमाने देशभक्ती, राष्ट्रीय अस्मिता आणि भारतीय सैन्यदलाच्या शौर्याप्रती कृतज्ञतेची भावना अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजुषा नागपुरे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, ब्रिगेडियर तरुणेश यांच्या हस्ते झाले. त्यानंतर अभिनव विद्यालयाच्या अकरा विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वंदे मातरम् या राष्ट्रगीताच्या गायनाने परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.
महापौर नागपुरे यांनी प्रास्ताविकात उपक्रमामागील संकल्पना, उद्देश आणि महत्त्व विशद केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास मंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा महापौरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यामध्ये ब्रिगेडियर तरुणेश (डेप्युटी जीओसी), कर्नल विकास सावळजे (एसएसओ, कॅन्टोन्मेंट) आणि कर्नल श्रीनिवास सातवळेकर (कर्नल व्हेटरन्स) यांचा समावेश होता. उपस्थित आमदारांचा पालिका आयुक्त राम यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर,
अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, विद्युत मुख्य अभियंता शेकटकर, सांस्कृतिक उपायुक्त टेंगळे, नगरसचिव योगिता भोसले, भवन रचना मुख्य अभियंता बिपीन शिंदे तसेच सर्व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.
कर्नल राजेशकुमार जिंदाल यांनी मनोगत राष्ट्रसेवेचे महत्त्व आणि भारतीय सैन्यदलाचे देश सुरक्षेसाठी असलेले अमूल्य योगदान अधोरेखित केले. यावेळी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या ५० वीरमाता आणि वीरपत्नींचा विशेष सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्याने उपस्थितांच्या मनात आदर, अभिमान आणि भावनिक कृतज्ञतेची भावना जागवली. यानंतर तरुणेश, मुरलीधर मोहोळ माधुरी मिसाळ, चंद्रकांतदादा पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना वंदे मातरम् चा गौरवशाली इतिहास, राष्ट्रभक्तीचे महत्त्व आणि सैन्यदलाचे अतुलनीय योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.
पणत्यांचे दीपप्रज्वलन ‘Vande Mataram’:
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होतो ते ३८ हजार २३३ पणत्यांचे एकाच वेळी केलेले दीपप्रज्वलन! लष्करी बँडच्या सुरांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले होते. सहभागींच्या माध्यमातून हजारो पणत्या प्रज्वलित केल्याने अवघा शनिवारवाडा दीपप्रकाशाने उजळून निघाला.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे वरिष्ठ अधिकृत परीक्षक स्वप्नील डांगरीकर यांनी या उपक्रमाची प्रत्यक्ष पडताळणी केली. त्यानंतर त्यांनी पुणे महापालिकेच्या या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाल्याची घोषणा केली.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकृत प्रमाणपत्र महापौर आणि पालिका आयुक्तांनी स्वीकारले. समारोप उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कर्नल रवि व वसुंधरा काशीकर यांनी केले. अखेर उपस्थितांनी राष्ट्रगीत जन गण मन सादर केले.





