Pune News | दस्त नोंदणीसाठी ‘गुणांकन पद्धत’ लागू ; नागरिकांचे काम आता लवकर

प्रभात वृत्तसेवा
पुणे – दुय्यम निबंधक कार्यालयांमधून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये अधिक गती आणि पारदर्शकता आणण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाने गुणांकन पद्धत लागू केली आहे. यामुळे दस्त नोंदणी, स्कॅनिंग, ई रजिस्ट्रेशन, ई मोहोर आणि इतर कामकाजासाठी अधिकाऱ्यांना निश्चित वेळेची मर्यादा पाळणे बंधनकारक झाले आहे. या प्रणालीअंतर्गत दुय्यम निबंधकांच्या कामगिरीचे मूल्यमापन केले जाणार आहे.
याची अंमलबजावणी सोमवारपासून (दि.1) पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील दस्त नोंदणीच्या 27 कार्यालयांमध्ये होणार आहे. राज्यभरात पुणे शहरात पहिल्यांदाच असा उपक्रम राबविला जात आहे.गेल्या २५ वर्षांपासून नोंदणी व मुद्रांक विभाग लोकाभिमुख कामकाज करत आहे. त्याचाच भाग म्हणून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये होणाऱ्या विलंबाला आळा घालणे, हा या गुणांकन पद्धतीचा मुख्य उद्देश असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सह जिल्हा निंबधक संतोष हिंगाणे यांनी सांगितले.
सेवा तत्परता गुणांकन पद्धतीत दस्त नोंदणी कार्यालयातील दुय्यम निबंधकांवर कामकाजाची जबाबदारी निश्चित केली असून, विविध कामांच्या पूर्ततेसाठी वेळेचे बंधन घालण्यात आले आहे. मुदतीमध्ये कामे पूर्ण केल्यास गुण मिळणार असले, तरी मुदतीत काम पूर्ण न झाल्यास गुण वजा केले जातील.
असे होईल गुणांकन..
दुय्यम निबंधकांनी कार्यालयीन वेळेपूर्वी किमान पाच मिनिटे अगोदर लॉगिन करणे आवश्यक आहे. जर संबंधित दुय्यम निबंधक पाच ते दहा मिनिटे उशिराने लॉगिन केल्यास वजा 10 गुण दिले जाणार आहे. दस्त नोंदणी झाल्यावर त्या दिवशीचे नोंदणी झालेले दस्तांचे स्कॅनिंग पूर्ण केल्यास 30 गुण मिळणार आहेत. जर एक दिवसानंतर विलंब होत गेल्यास वजा गुण दिले जाणार आहे.
होणारे फायदे..
– दुय्यम निबंधक कार्यालयात वेळेवर उपस्थित राहतील
– नोंदणी झालेले दस्तांचे स्कॅनिंग त्याच दिवशी होईल
– नोंदणी क्रमानेच दस्तांचे स्कॅनिंग, वशिलेबाजी टळणार
– भाडेकराराच्या दस्तांही लवकर नोंदणी होईल
– डिजिटल स्वाक्षरीचे दस्त मिळतील
ई मोहोरची अंमलबजावणी..
ई मोहोरअंतर्गत स्कॅन केलेल्या पीडीएफ दस्तऐवजांवर दुय्यम निबंधक यांची डिजिटल स्वाक्षरी केली जाईल. प्रायोगिक तत्त्वावर शहरातील तीन कार्यालयांमध्ये या प्रकल्पाची चाचणी यशस्वी झाली आहे. त्यानंतर आता दोन्ही शहरांतील उर्वरित सर्व कार्यालयांमध्ये सोमवारपासून अंमलबजावणी होणार आहे. यामुळे नोंदणी प्रक्रिया अधिक जलद होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
“सेवा तत्परता गुणांकन पद्धतीमुळे नागरिकांना वेळेवर सेवा मिळेल आणि कामामध्ये होणारा अनावश्यक विलंब टाळता येईल. ही नवीन पद्धत कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे योग्य मूल्यमापन करेल आणि उत्कृष्ट काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देईल.”
– संतोष हिंगाणे, सह जिल्हा निबंधक, पुणे





