Pune News : पुण्यातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी संरक्षण तंत्रज्ञानातील बी टेक प्लस एम टेकची सुवर्ण संधी !

पुणे : पुण्यातील शिवणे परिसरातील नामांकित संस्था असलेल्या एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अँड रिसर्च ऑर्गनायझेशन (AERO) आणि इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स सायंटिस्ट्स अँड टेक्नॉलॉजिस्ट (IDST) यांच्या दरम्यान संरक्षण तंत्रज्ञानात बी टेक प्लस एम टेकसाठी सामंजस्य करार (८ मे रोजी) करण्यात आला असून, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे.
संरक्षण तंत्रज्ञानामध्ये बी टेक प्लस एम टेकची संधी आता पुण्यातील युवकांना मिळणार आहे. संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होत असताना, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अशा नवनवीन संधी उपलब्ध होत असल्याने, युवकांच्या कौशल्य विकासाला देखील चालना मिळणार आहे.
शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची स्थापना २००१ साली पुण्यात झाली. ही संस्था विमान वाहतूक शिक्षण क्षेत्रात अग्रणी आहे. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग अँड रिसर्च ऑर्गनायझेशन (AERO), शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची विस्तारित शाखा असून, मार्च २००८ साली या संस्थेची स्थापन करण्यात आली आहे.
डीआरडीओने एआयसीटीई सोबत सहकार्य करार केला असून, संरक्षण तंत्रज्ञानातील नियमित एमटेक अभ्यासक्रम सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर या करारानुसार संरक्षण तंत्रज्ञानातील इंटिग्रेटेड एम टेकसाठी (B Tech plus M Tech) चा अभ्यासक्रम AERO द्वारे तयार केला जाणार असून, ADYPU द्वारे मंजूर केला जाणार आहे.
यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स सायंटिस्ट्स अँड टेक्नॉलॉजीज (IDST) ची महत्त्वाची भूमिका राहणार असून, कौशल्य आणि तंत्रज्ञानाची आदानप्रदान करण्यात येणार आहे. AERO चे ध्येय एरोस्पेस, एरोनॉटिकल, एव्हीओनिक्स आणि संरक्षण तंत्रज्ञानातील प्रगतीला गती देणे आणि शिक्षण, संशोधन आणि विकास, उद्योग-संस्था सहकार्याचा फायदा घेऊन पाया मजबूत करणे हे आहे.
या उपक्रमाचा उद्देश शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करून महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये नावीन्य आणि प्रगती साधणे असा आहे. ज्यामाध्यातून कौशल्ययुक्त युवक घडावेत यासाठी संस्था काम करत आहे.
या सामंजस्य कराराच्या प्रसंगी IDST चे अध्यक्ष डॉ देसाई बापूराव सरवदे, उपाध्यक्ष युवराज श्रीराम ढोके, सचिव रामनाथ पंढरीनाथ वायकर, सरचिटणीस शेखर शरद कुलकर्णी, AERO चे अध्यक्ष अंशुल बी शर्मा, बबिता मेहरा, AERO चे सचिव डॉ एम सुरेश कुमार उपस्थित होते.
संरक्षण क्षेत्रातील भारताची आयात कमी व्हावी आणि आपण अधिक स्वावलंबी होऊन भविष्यात इतर देशांमध्ये निर्यात व्हावी, ही या करारामागील इच्छा आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी हे युवक काम करतील!
– AERO चे अध्यक्ष अंशुल बी शर्मा





