Pune News: ५० रुपयांच्या कामासाठी २,००० रुपयांची उकळत? पुण्यात महाईसेवा केंद्रांचा भोंगळ कारभार उघड
Pune News: नवीन शिधापत्रिका, नाव नोंदणी अन् दुरुस्तीसाठी पुण्यातील महाईसेवा केंद्रांकडून अवाजवी पैशांची वसुली; नागरिकांमध्ये तीव्र असंतोष.

Pune News- नवीन शिधापत्रिका काढणे, शिधापत्रिकेत नाव वाढविणे किंवा कमी करणे, पत्त्यात अथवा इतर तपशिलात दुरुस्ती करणे यासह विविध कामांसाठी नागरिकांना महाईसेवा केंद्रांचा आधार घ्यावा लागतो. मात्र, याचाच गैरफायदा घेत पुण्यातील महाईसेवा केंद्रांकडून नागरिकांकडून अवाजवी शुल्क आकारले जात असल्याची तक्रार पुढे आली आहे. विविध कामांसाठी तब्बल दोन हजार रुपयांपर्यंत पैसे घेतले जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
बोगस शिधापत्रिका तसेच एकाच व्यक्तीच्या दोन ठिकाणी शिधापत्रिका असण्यास आळा घालण्यासाठी ऑनलाइन प्रणाली सुरू करण्यात आली आहे. तसेच, पात्र लाभार्थ्यांची माहिती अचूक पद्धतीने नोंदविणे आणि अपात्र लाभार्थ्यांना रोखणे हा या प्रक्रियेचा उद्देश आहे. मात्र, नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अवाजवी पैसे आकारले जात आहेत. विशेष म्हणजे, पैसे भरूनही काही नागरिकांना अडीच महिने उलटूनही शिधापत्रिका मिळालेली नसून,
कार्यालये व केंद्रांवर वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. वास्तविक, आधारकार्ड आणि वीजबिल यासारखी आवश्यक कागदपत्रे सादर करून शिधापत्रिकेसाठी ऑनलाइन अर्ज करता येतो. पूर्वी नवीन शिधापत्रिका ३० दिवसांच्या आत देण्याची प्रक्रिया होती. आता, शासनाने प्रक्रियेत बदल करून १८ दिवसांच्या आत शिधापत्रिका देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे अर्जदारांना अनावश्यक विलंब होणे अपेक्षित नाही.
ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया…
शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीच्या https://share.google/PHKt5FpLzD81z9yHY या संकेस्थळावरून शिधापत्रिकाशी संबंधित कामे केली जात आहेत. शिधापत्रिकेची माहिती व्यवस्थापित करणे. लाभार्थी/कुटुंबाची माहिती. नवीन शिधापत्रिका, दुरुस्ती किंवा बदल. धान्य वितरणाशी संबंधित नोंदी. रेशन दुकान व लाभार्थींची माहिती आदी कामे या संकेतस्थळावरून करायची आहेत. केसरी शिधापत्रिकासाठी ५० तर पांढऱ्या नवीन शिधापत्रिकासाठी १०० रुपये फी आकारली जाते.





