Pune News : महापालिकेच्या वसुलीला निवडणुकीचा फटका! १३ हजार कोटींचा डोंगर, मनुष्यबळ अपुरे, उद्दिष्ट धोक्यात..वाचा सविस्तर

प्रभात वृत्तसेवा
पुणे : महापालिकेने मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कंबर कसली असली तरी निवडणुकीमुळे अपुऱ्या मनुष्यबळाचा वसुलीला फटका बसणार आहे. मिळकतकर विभागाने थकबाकी वसुलीसाठी प्रभागनिहाय याद्या तयार केल्या आहेत. थकबाकी, कर वसुलीसाठी या विभागाला १५० ते २०० अतिरिक्त मनुष्यबळाची गरज आहे. सध्या पालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केले आहेत. यामुळे मिळकत कर विभागाला सध्या उपलब्ध असलेल्या १५० कर्मचाऱ्यांवरच वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आङे.
थकबाकी वसुलीसाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी बैठक घेतली. या बैठकीत वसुलीसाठी सविस्तर चर्चा झाली. याच विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीची जबाबदारी दिली असल्याने वसुलीच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.पालिकेच्या मिळकतकर विभागाकडे सुमारे १४ लाख मिळकतींची नोंद आहे. त्यापैकी सुमारे तीन ते चार लाख थकबाकीदार असून ही थकबाकी १३ हजार कोटींच्या घरात पोहोचली आहे.
कर संकलन विभागास २०२५-२६ साठी ३२०० कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट दिले असून, सहा महिन्यांत १७०० कोटी रुपयांची वसूली झाली आहे. गेल्या काही वर्षांत या विभागाचे वार्षिक उत्पन्न २३०० कोटींच्या आतच राहिले आहे. त्यामुळे यंदा थकबाकी वसुलीसाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मात्र, आता कर्मचारी मिळणे कठीण झाल्याने ही मोहीम सुरू होण्याआधीच बारगळण्याची शक्यता आहे.
वसुलीसाठी सूक्ष्म नियोजन..
कर संकलन विभागाच्या वसुलीची जबाबदारी ३० विभागीय निरीक्षक आणि १२० पेठ निरीक्षकांवर आहे. आतापर्यंत त्यांना वसुलीसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय यादी दिली जात होती. हे कर्मचारी वर्षानुवर्षे कर न भरणाऱ्या थकबाकीदारांकडे जात होते. पैसे वसूल होत नसल्याने वेळेचा अपव्यय होत होता. त्यामुळे आता या कामाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
त्या अंतर्गत विभागीय निरीक्षक व पेठ निरीक्षकांना अचानक भरणा बंद केलेले मिळकतकरधारक, कोरोनानंतर भरणा बंद केलेले मिळकतकरधारक, आधी कर लावण्यासाठी अर्ज केलेले पण नंतर भरणा बंद केलेल्या मिळकती, तसेच एकाच सोसायटीतील थकबाकीदार अशा विविध प्रकारच्या याद्या दिल्या आहेत. त्यांच्याकडून वसूलीवर भर देण्यासोबतच जुन्या थकबाकीदारांवर कारवाई करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.





