विश्रांतवाडी – पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी ही मोठी समस्या निर्माण झालेली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी खराडी-शिवणे हा नदीपात्रातील प्रलंबित रस्ता पूर्ण करण्यासाठी नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
बुधवारी (दि. २७) पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. तसेच इतर अधिकाऱ्यांची पठारे यांनी भेट घेतली. भेटीदरम्यान खराडी-शिवणे या रस्ता प्रकल्पातील रखडलेले भुसंपादन, निधी, कामाची सद्यस्थिती या मुद्यांवर विस्तृत चर्चा केली. यानुसार महापालिका प्रशासनाकडून लवकरच खराडी-शिवणे रस्त्याची पाहणी करण्यात येणार आहे.
खराडी-शिवणे हा रस्ता प्राधान्याने पूर्ण करणे फार गरजेचे आहे. हा पर्यायी रस्ता वाहतूक कोंडी लक्षणीयरित्या कमी करू शकतो. पालिका प्रशासनाच्या सहकार्याने हे काम लवकरात लवकर पूर्णत्वाला नेण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
मागील १० वर्षांत रस्त्याच्या कामाकडे झालेले दुर्लक्ष आणि चालढकलीमुळे नागरिकांना झालेला त्रास येणाऱ्या काळात कमी होईल. पालिका प्रशासनचाही या कामात मोठा हातभार लागणार असून तत्परतेने हे काम करण्यावर भर असणार आहे, असा विश्वास बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केला.