Pune Unseasonal Rains: पुणे शहरात दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने पहिला बळी घेतला आहे. सिंहगड रोड परिसरात झाड कोसळून एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. विशेषतः सिंहगड रोड परिसरात पावसाचा जोर अधिक होता. नवश्या मारुती मंदिराजवळ पावसामुळे एक मोठं झाड कोसळलं. या झाडाखाली तिघेजण अडकले होते. यामध्ये रंजना नवनाथ गिरी असे मृत महिलेचे नाव असून त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवण्यात आले. झाडाखाली अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आले, मात्र रंजना गिरी यांना वाचवता आले नाही. उर्वरित दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हेही वाचा – Unseasonal Rains: पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी; रस्त्यांचे नद्यांमध्ये रूपांतर दरम्यान, अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक भागांत पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोंडवा, उत्तमनगर, दापोडी, सिंहगड रोड, कोथरूड तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी पाण्यात अडकून वाहनं बंद पडल्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागला. हवामान खात्याने पुढील काही दिवस वातावरण ढगाळ राहणार असून अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवला आहे.