pune news : वैवाहिक संबंध प्रस्थापित न झाल्याच्या कारणावरून विवाह रद्द; पत्नीने केला होता अर्ज

पुणे : विवाहानंतर पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले नाहीत. त्यामुळे विवाह पूर्णत्वास गेला नाही, असा निष्कर्ष काढत कौटुंबिक न्यायालयातील प्रमुख न्यायाधीश मनिषा काळे यांनी विवाह रद्द केला.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. या प्रकरणात पत्नीतर्फे पुणे बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अॅड. के.टी.आरू-पाटील यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. केदार केवळे, अॅड. किर्ती गायकवाड आणि अॅड. वीणा गुडी यांनी सहकार्य केले.
दोघे आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. ती येथे, तर तो कॅनडा येथे असतो. पारंपारिक पध्दतीने पाहणी करून दोघांनी एकमेकांना पसंद केले. साखरपुडाही झाला. वैदिक पध्दतीने विवाह करणार होते. विवाहानंतर दोघे परदेशात स्थायिक व्हायचे होते.
दरम्यान पतीने आग्रह धरला की, तुर्तास नोंदणी पध्दतीने विवाह करू. त्यानंतर तारिख काढून वैदिक पध्दतीने विवाह करू. तो परदेशात असतो. नोंदणी पध्दतीने विवाह केल्यास फायदा होईल, असे पतीकडून सांगण्यात आले. त्यानुसार ती तयार झाली.
नोंदणी पध्दतीने विवाह केला. त्यानंतर वैदिक पध्दतीने लग्न करण्यास पतीकडून टाळाटाळ होऊ लागली. आज करू उद्या करू म्हणत वैदिक पध्दतीने विवाह करायचे राहून गेले. पती एकटाच परदेशात निघून गेला. वैदिक पध्दतीने विवाहन न करता फसवणूक केली आहे.
नोंदणी लग्नानंतर दोघात शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले नाहीत. त्यामुळे कायद्याने परिपूर्ण विवाह झालेला नाही. त्यामुळे लग्न रद्द करण्याची मागणी पत्नीने येथील कौटुंबिक न्यायालयात केली. त्यानंतर पती-पत्नी दोघांना तपासण्यात आले.
त्यानंतर पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंध झाले नाहीत. त्यामुळे लग्न रद्द करण्यास पात्र असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने लग्न रद्द केले. या प्रकरणात ॅड. आरू-पाटील यांनी कॅनडा येथील पतीला व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे तपासले.
घटस्फोट घेतल्यानंतर “घटस्फोटीत’ असा शिक्का पडतो. मात्र, चुक नसतानाही जोडीदारांकडून फसवणूक झाली आहे. त्यामुळे लग्न रद्द करण्यासाठी अर्ज केला जातो. तो मंजुर झाला आहे.
अॅड. के.टी. आरू-पाटील, पत्नीचे वकील
विवाह रद्दसाठी १ वर्षाच्या आत करावा लागतो अर्ज
विवाह झाल्यापासून १ वर्षाच्या आत विवाह रद्द करण्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. जानेवारी २०२१ मध्ये दोघांचा नोंदणी पध्दतीने विवाह झाला होता. तिने २९ सप्टेंबर २०२१ रोजी विवाह रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. तो मंजुर झाला.




