पुणे – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना मराठीच्या मुद्द्यासह हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणार आहे. उत्तर प्रदेशसह चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाने यश मिळवल्याचे मानले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर मनसेनेही आपला मोर्चा हिंदुत्वाच्या मार्गावर वळवला होता, मात्र त्याला आक्रमक रुप देण्याचा प्रयत्न सुरू करण्याचे संकेत मिळत आहेत.
महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी राज ठाकतरे यांनी मुबईत संवाद साधला. त्यावेळी आक्रमक हिंदुत्वासह मोठी माणसांची मनसे पुन्हा दिसली पाहिजे असे राज ठाकरे यांनी सांगितले. केवळ वरीष्ठ नेतेच नव्हे तर सर्वांनीच या दोन मुद्द्यावर बोलले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यात भाजपा नेत्यांच्या आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. पण पक्ष स्वबळावर वाढवण्याची भूमिका राज ठाकरे यांनी नेहमीच घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपाच्या विरोधात जाहीर सभा घेतल्या. पण त्याचा लाभ कॉंग्रेस आघाडीला होण्याऐवजी तिसऱ्या आघाडीला झाला. त्यानंतर आघाडीने राज ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीत दूर ठेवले. त्यानंतर शिवसेनेशी घरोबा करत आघाडीने राज यांना मनसे दूर ठेवले. त्यामुळे राज यांनी एकला चलोच्या भुमिकेवर शिक्कामोर्तब केले आहे.
भाजपाशी आघाडी करण्यापेक्षा निवडून येण्याच्या शक्यता असणाऱ्या जागांवर तडजोड करायची आणि पक्षीय बल वाढवायचे असे मनसेचे धोरण असल्याचे मत राजकीय निरीक्षकांत व्यक्त होत आहे. शिवसेनेची जागा घ्यायची असल्यास मराठी आणि हिदुत्व या दोन मुद्द्यायंवर आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. त्यातूनच मनसेला सत्तेचा सोपान चढण्याची संधी मिळू शकेल.
मुंबईत झालेल्या बैठकीत दोन ते तीन विषयांवर चर्चा झाली. मनसेकडून तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. महिलांचा या जयंती उत्सवात सहभाग वाढवायचा. शिवाजी पार्कवर हा सोहळा पार पडणार आहे. स्वत: राज ठाकरे या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.गुढीपाडव्याला मनसेचा मेळावा येत असतो. करोनामुळे मागील दोन वर्षे हा मेळावा झाला नाही. आता येत्या 2 एप्रिल रोजी हा मेळावा होणार आहे. हा मेळावा सुद्धा उत्साहात साजरा करायचा आहे. निवडणुका होऊ शकतात हे गृहीत धरून निवडणुकांची तयारी पूर्णपणे ताकदीने करायची आहे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत आमचा एकटा जीव सदाशिव सुरू आहे,अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांना मुंबईत दिली. ती मनसेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला पुष्टी देणारी आहे.
ट्रेलरचं रूपांतर पिक्चरमध्ये दिसेल
जी नळावरची भांडणं राजकारणात सुरू आहेत ते पाहता जनतेच्या मनामध्ये राज ठाकरे यांच्याबद्दल एक भावना तयार झालेली आहे. जे काही करू शकते फक्त राज ठाकरेच करू शकतात. तुम्ही थोडी वाट पाहा तुम्हाला सुद्धा ट्रेलरचे रूपांतर पिक्चरमध्ये झालेले दिसेल, असेही बाळा नांदगावकर म्हणाले.