Pune News : २.५ TMC पाणी वाचणार! खडकवासला बोगद्याचं काम सुसाट; ‘बुमर’ मशिनचा धडाका सुरू
Pune News : कात्रज आणि वडकी येथूनही लवकरच कामाला सुरुवात; ३ वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे जलसंपदा विभागाचे उद्दिष्ट.

Pune News – खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान कालवा बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. खडकवासला, धायरी, वडाचीवाडी आणि उरुळी देवाची अशा चार ठिकाणांवरून एकाच वेळी चार टनेल बेअरिंग मशिन (बुमर) माध्यमातून बोगदा खोदण्याचे काम सुरू असून दोन महिन्यात एक किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. एका बुमरच्या माध्यमातून दिवसामध्ये आठ मीटर बोगद्याचे काम पूर्ण करण्यात येत आहे.
आणखी तीन ठिकाणांहून लवकरच कामास सुरूवात करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करण्याची मुदत तीन वर्षांची असणार आहे.राज्य शासनाबराबेरच या प्रकल्पास पर्यावरण विभागाची यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून प्रकल्पाच्या कामासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान ३४ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी येण्याची योजना जलसंपदा विभागाकडून तयार करण्यात आली आहे.
सध्या, बुमर मशिनच्या साहाय्याने ६.३ डायमीटर डी आकाराच्या बोगदा खोदण्यात येत आहे. काम गतीने होण्यासाठी एकाचवेळी चार ठिकाणाहून बोगदा खोदण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे सुमारे अडीच टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. अतिरिक्त ३ हजार ४७२ हेक्टरवरील क्षेत्राला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. जलप्रदूषण रोखण्यासही मदत होणार आहे.
कात्रज, वडकी येथूनही…
कात्रज, वडकी आणि लोणी काळभोर या बाजुनेही बोगद्याच्या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. सुमारे २८ किलोमीटर लांबीचा हा बोगदा असणार आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर त्यातून प्रती सेकंद ४१ क्यूसेस पाणी सोडण्यात येणार आहे. धरणाच्या भिंतीपासून मागील बाजूस ९० मीटर अंतरावर आणि जलाशयाच्या खालील बाजूस १८ मीटर खोलीवरून हा बोगदा जाणार आहे. त्यामुळे पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार आहे. परिणामी, प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होणार आहे.





