प्रभात वृत्तसेवा पुणे – केंद्र शासनाकडून पुणे मेट्रोच्या विस्तारीत मार्गांना मिळालेल्या मंजुरीमुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. शहराच्या चारही दिशांना मेट्रोचे जाळे पोहोचणार असून विद्यमान मार्गांसह नव्याने मंजूर झालेल्या मार्गांमुळे पुण्यातील दैनंदिन प्रवाशांची संख्या तब्बल पाच लाखांनी वाढण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व मार्गांचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. खडकवासला ते खराडी आणि नळ स्टॉप ते माणिकबाग (सिंहगड रस्ता) या नव्या मार्गांवर एकट्या ४ लाख ९ हजार प्रवाशांची वाढ अपेक्षित आहे. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारीत मार्गांमुळे सुमारे एक ते दीड लाख प्रवासी वाढणार असल्याचे सांगण्यात आले. शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या मार्गांवर मेट्रोची सेवा उपलब्ध होणार असल्याने खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल, यामुळे वाहतूक कोंडी आणि वाढते वायू प्रदूषण या दोन्ही समस्यांवर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे. असा होईल नवीन मार्गांचा फायदा.. खराडी–हडपसर–स्वारगेट–खडकवासला मार्ग (२५.५२ कि.मी.) हा मार्ग पूर्व, दक्षिण आणि पश्चिम पुण्याला वर्तुळाकार पद्धतीने जोडण्यात येत असल्याने हा शहरातील सर्वात महत्त्वाचा मेट्रो मार्ग मानला जात आहे. मार्गालगत पर्यायी रस्ते नसल्याने सध्या सर्वाधिक वाहतूक कोंडी हडपसर, फातिमा नगर, स्वारगेट व सिंहगड रस्त्यावर होते. या नव्या मेट्रो मार्गामुळे सिंहगड रस्ता, माणिकबाग, स्वारगेट, पुणे कॅन्टोन्मेंट, फातिमा नगर, हडपसर, मगरपट्टा सिटी, मुंढवा आणि खराडी हे महत्त्वाचे भाग एकाच मार्गाने जोडले जाणार आहेत. नागरिकांना घरापासून कार्यालयापर्यंत किंवा शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत थेट प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. नळ स्टॉप–वारजे–माणिकबाग मार्ग (६.१२ कि.मी.) नळ स्टॉप ते माणिकबाग हा मार्ग वारजे, कर्वेनगर, सनसिटी, नांदेड सिटी व महामार्गालगतच्या परिसरासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असून येथे सध्या पीएमपीचा पर्याय असला तरी तो अपुरा पडतो. अनेक नागरिकांना शहराच्या विविध भागात जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागतो, त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक ताण वाढतो. या नव्या मेट्रो मार्गामुळे या सर्व परिसरांना थेट हडपसर, वाघोली, पिंपरी-चिंचवडपर्यंत मेट्रोने प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे शहराच्या कोअर भागात जाणे, नोकरी-व्यवसायासाठी दररोजचे ये-जा करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. हा मार्ग भविष्यात सिंहगड रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.