Pune Nagar road traffic jam – पुणे–नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनत चालली आहे. शिक्रापूर, सणसवाडी, रांजणगाव, कोरेगाव भीमा, लोणीकंद ते वाघोली या संपूर्ण परिसरामध्ये दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. सकाळी कार्यालयीन वेळेत आणि सायंकाळी कामावरून घरती परतणाऱ्या नागरिकांना, कामगारांना या कोंडीचा मोठा फटका बसत आहे. महामार्गावर अवजड वाहनांची संख्या प्रचंड वाढणे, लोणिकंद रस्त्यावरील अपूर्ण कामे, बेशिस्त पार्किंग आणि अपुरे वाहतूक नियोजन यामुळे येथील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. दररोज हजारो कामगार, व्यावसायिक आणि प्रवासी या मार्गाने प्रवास करतात. मात्र अनेक ठिकाणी सिग्नल व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली असून, वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक असणारा पोलीस बंदोबस्तही अपुरा असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः कोरेगाव भीमा गणेश भुवन चौक ते वाडागाव फाटा, शिक्रापूर बाजारपेठ, सणसवाडी चौक परिसर भागात वाहतुकीचा वेग अक्षरशः थांबत असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. काही वेळेस तर वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकांनाही मार्ग मिळत नसल्याने गंभीर रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. अनेकदा शाळकरी मुलांच्या बसही कोंडीत अडकून राहत असल्याने पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. वाहतूक पोलीस. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नसल्याचा आरोप केला जात आहे. महामार्गालगत सुरू असलेली अनधिकृत पार्किंग आणि रस्त्यावरील अतिक्रमणे यांवर कारवाई होत नसल्यामुळे कोंडीत भर पडत आहे. पुणे–नगर रोडवरील वाहतूक कोंडी ही आता केवळ तात्पुरती गैरसोय राहिलेली नसून नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी गंभीर समस्या बनली आहे. प्रशासन आणि वाहतूक विभागाने तातडीने ठोस उपाययोजना न केल्यास आगामी काळात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांची नामुष्की आणि नागरिकांचा संताप वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी नियुक्त असलेले वाहतूक पोलीस अनेक ठिकाणी अनुपस्थित दिसत असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी पोलीस कर्मचारी केवळ दंडात्मक कारवाई करताना दिसतात; मात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून नियोजन करताना कमी दिसत असल्याची टीका वाहनचालक करत आहेत. कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह वरिष्ठ अधिकारी दौऱ्यावर आल्यानंतर काही काळासाठी वाहतूक सुरळीत केली जाते; मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होत असल्याने वाहतूक शाखेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोशल मीडियावरही वाहतूक पोलिसांच्या निष्क्रियतेबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, दंड वसुलीवर भर आणि वाहतूक नियंत्रणाकडे दुर्लक्ष असा आरोप नागरिकांकडून होत आहे.