llegal Rickshaw Parking : वाकडमध्ये रिक्षाचालकांची मनमानी! फिनिक्स मॉलसमोर वाहतूककोंडीचा विळखा; पोलिसांचे दुर्लक्ष?
llegal Rickshaw Parking : नो-पार्किंगचे फलक फक्त नावापुरतेच; फिनिक्स मॉलसमोर रिक्षाचालकांनी थाटले बेकायदेशीर स्टँड.

llegal Rickshaw Parking – वाकडमधील फिनिक्स मॉल परिसरात रिक्षाचालकांचा बेशिस्तपणा वाढला आहे. त्यातच भर म्हणून वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने या परिसरात नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. नो पार्किंग क्षेत्रात सर्रासपणे रिक्षा उभ्या राहत असूनही त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र समोर आले आहे.
मॉलसमोरील रस्त्यावर नो पार्किंगचे स्पष्ट फलक असूनही रिक्षाचालक बिनधास्तपणे वाहन उभे करत आहेत. यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहनचालकांना अडथळा निर्माण होतो आणि वारंवार वाहतूककोंडी होते. विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळी हा त्रास अधिक तीव्र होतो. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात वाहतूकीची कोंडी होऊ नये म्हणून ट्रॅफिक वॉर्डन नियुक्त केले आहेत.
मात्र हेच ट्रॅफिक वॉर्डन या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असून रिक्षाचालकांना हटकण्याऐवजी तेच या ठिकाणी रिक्षा स्टँड असल्याचे इतर वाहन चालकांना सांगतात. प्रत्यक्षात अधिकृत रिक्षा स्टँड असल्याचे कोणतेही स्पष्ट चिन्ह किंवा आदेश दिसत नाहीत. त्यामुळे वॉर्डन यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जर हा अधिकृत रिक्षा स्टँड असेल, तर ‘नो पार्किंग’चा फलक का लावण्यात आला, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
तसेच, अधिकृत परवानगी नसल्यास बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या रिक्षांवर वाहतूक पोलीस कारवाई का करत नाहीत, याबाबतही नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरामध्ये मोठी वाहतूककोंडी होत असते. शनिवार, रविवार आणि इतर सुट्यांच्या दिवशी या परिसरामध्ये नागरिकांची मोठी गर्दी असते.
तसेच सायंकाळच्या वेळी देखील याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहतूककोंडी होते. तसेच रिक्षाचालकांना शिस्त पाळण्याच्या सूचना देण्याऐवजी पोलिस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
संघटनांशी आर्थिक हितसंबध
दरम्यान, नो पार्किंग परिसरात वाहन पार्क केल्यास वाहतूक पोलिसांकडून तातडीने कारवाई केली जाते. दुचाकी वाहने उचलून नेली जातात. तर चारचाकी वाहनांना जॅमर लावले जाते. त्यांच्याकडून हजारो रुपयांचा दंड वसूल केला जातो. मात्र, नो पार्किंगच्या ठिकाणी रिक्षा उभ्या करून वाहतूककोंडी करणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांवार कोणतीही कारवाई पोलिस प्रशासन करत नाही. त्यामुळे रिक्षा संघटनांशी पोलिसांचे आर्थिक हितसंबध असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
नागरिकांची मागणी
– ‘नो पार्किंग’ क्षेत्रात कडक अंमलबजावणी
– अधिकृत रिक्षा स्टँड असल्यास स्पष्ट फलक व मर्यादा निश्चित करणे
– बेकायदेशीर पार्किंग करणाऱ्या रिक्षांवर दंडात्मक कारवाई
– ट्रॅफिक वॉर्डनच्या कामकाजाची चौकशी






