Koregaon Bhima Crime – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील शिवशंभू पार्क परिसरात अंगणात पाणी मारत असताना शेजारील मुलांच्या अंगावर पाणी उडाल्यावरून दोन कुटुंबांत जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका तरुणाला विटा आणि प्लायवूडने मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांत राहुल बडेकर आणि विजय बडेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोरेगाव भीमा येथील शिवशंभू पार्क परिसरात रवींद्र गंगावणे यांची मुले घराबाहेर खेळत होती. यावेळी शेजारी राहणाऱ्या गौरी बडेकर या अंगणात पाणी मारत असताना काही पाणी रवींद्र यांच्या मुलांच्या अंगावर उडाले. या कारणावरून रवींद्र यांची पत्नी सुवर्णा आणि गौरी बडेकर यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. यावेळी रवींद्र गंगावणे हे दोघींना समजावून सांगण्यासाठी गेले असता, शेजारील राहुल बडेकर आणि विजय बडेकर यांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी मिळून रवींद्र यांना विटा आणि प्लायवूडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात रवींद्र गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रवींद्र विलास गंगावणे (वय ३०, रा. ढेरंगे वस्ती, शिवशंभू पार्क, कोरेगाव भीमा) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल बडेकर आणि विजय बडेकर यांच्यावर गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास पोलीस हवालदार नवनाथ नाईकडे करत आहेत.