Pune: सुपारी घेऊन खून? वर्चस्ववादामुळे प्रतिस्पर्धी टोळीवरही संशय

पुणे – पोलिसांकडे दाखल फिर्यादीनुसार वनराज आंदेकर यांचा खून कौटुंबिक वादातून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यामागे टोळी वर्चस्व हा एक धागा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. खून प्रकरणातील एक आरोपी सोमनाथ सयाजी गायकवाड हा आंदेकर टोळीचा प्रतिस्पर्धी आहे.
त्याची स्वत:ची टोळी असून तो मोक्कातून जामिनावर बाहेर आहे. त्याच्या टोळीतील दोन सदस्य आंदेकर टोळीच्या रडारवर होते. यामुळे “आपल्या सदस्यांना काही होण्याआधी आपणच आंदेकर टोळीला धक्का देऊ,’ असा विचार गायकवाड याने केला होता का? याची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी सध्या सोमनाथला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, “सोमनाथ याने करोनाच्या काही महिने अगोदर स्वत:ची टोळी स्थापन केली. तो त्याची टोळी धनकवडी परिसरातून चालवत होता. यामुळे आंदेकर आणि गायकवाड यांच्यामध्ये अधूनमधून छोट्या-मोठ्या चकमकी होत होत्या. सोमनाथ आणि सूरज ठोंबर हे आंदेकर टोळीचे प्रतिस्पर्धी एका मोक्का प्रकरणात कारागृहात होते. सूरज ठोंबरे संबंधित प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याने त्याला जामीन मिळाला नाही.
मात्र, सोमनाथला जामीन मिळाला. मात्र, जामीन देताना त्याला शहर परिसरात येण्यास बंदी घालण्यात आली होती. पोलिसांनी सध्या सोमनाथला ताब्यात घेतले असले, तरी तो या प्रकरणात आपला काही संबंध नसल्याचे सांगत आहे. मात्र, वनराजचा खून होणार असल्याची कल्पना असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
वनराजचा खून केलेल्या आरोपींमधील दोन ते तीन संशयित हे सोमनाथच्या टोळीतील सदस्य आहेत. यातील दोघांवर आंदेकर टोळीचा पूर्वीपासूनच बदला घेण्याचा प्रयत्न होता.’ यामुळे कौटुंबिक वाद पुढे करुन त्याआड सोमनाथनेच वनराजचा गेम केला का? ही बाब पोलीस पडताळत आहेत.
राजकारण आणि गुंडगिरी…
वनराज आंदेकर हे २०१७ मध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांच्या आधी त्यांची आई राजश्री आंदेकर आणि चुलत भाऊ उदयकांत आंदेकर हे देखील नगरसेवक राहिले आहेत. वनराज यांच्याच कुटुंबातील वत्सला आंदेकर यांनी पुणे शहराच्या महापौर म्हणूनही काम पाहिले आहे.
आंदेकर टोळी चालवणाऱ्या कुटुंबातील असले, तरी वनराज हे गुन्हेगारी कृत्यांपासून लांब होते. ते राजकारणात सक्रीय होते. मात्र, त्यांचे वडील सूर्यकांत आंदेकर यांच्यावर १९८५ पासून अनेक गंभीर गुन्हे आहेत. ते २०२३ मधील एक खुनाच्या गुन्ह्यात जानेवारी २०२४ मध्ये जामिनावर बाहेर पडले आहेत. ते सध्या बारामतीत वास्तव्यात आहेत. सध्या सूर्यकांत आणि कृष्णा आंदेकर हे टोळी चालवत असल्याचे पोलीस सांगतात.
…मग वनराज आंदेकरांचा खून का ?
वनराजचा खून का करण्यात आला? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर यावर पोलिसांचे असे म्हणणे आहे की , “जामिनावर असलेला सूर्यकांत आंदेकर सध्या बारामतीत त्यांच्या गँगमधील सदस्यांसह राहात आहे. तर, कृष्णा सूर्यकांत आंदेकरही टोळीतील सदस्य सोबत घेतल्याशिवाय एकटा बाहेर पडत नाही.
मग सहजसोपे टार्गेट वनराजच होते. ते जरी गुन्हेगारीत सक्रीय नसले, तरी जामिनासाठी सहकार्य करणे, राजकीय दबाव टाकून गुन्हे मागे घेण्यास लावणे, मालमत्ता संभाळणे अशा प्रकारे टोळीला एक भक्कमपणे साथ देत होते. यामुळे टोळीचा आधारस्तंभच संपवला, तर टोळीला मोठा धक्का बसेल असाही हेतू खुनामागे असल्याची शक्यता आहे.
आंदेकर टोळीचा इतिहास
आंदेकर टोळी ही पुण्यातील जुन्या गुन्हेगारी टोळ्यांपैकी एक होय. नाना पेठ परिसरात दहशत निर्माण करणाऱ्सह आंदेकर टोळीचा इतिहास मोठा आहे. १९८० च्या दशकात या टोळीने पुण्यात धुमाकूळ घातला होता. या टोळीचा मोहरक्या बाळू आंदेकर होता. बाळूच्या निधनानंतर ही टोळी बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याने पुढे चालवली. त्यानेही १९९० च्या दशकात दहशत निर्माण केली होती.
प्रमोद माळवदकर याच्या खूनप्रकरणी बंडू आंदेकर याला जन्मठेपही सुनावण्यात आली होती.
बंडू आंदेकर याच्यावर खून, शस्त्रे बाळगणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी मारामारी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आंदेकर आणि माळवदकर यांची सुरुवातीला एकच टोळी होती. पण, अंतर्गत वादांतून प्रमोद माळवदकर वेगळा झाला. १९ नोव्हेंबर १९९७ मध्ये पुणे पोलिसांच्या क्राइम ब्रँचने प्रमोद माळवदकर याला संपवले.
या नंतर आंदेकर गँगने पुण्यात हातपाय पसरले. बाळू आंदेकर याच्या निधनानंतर सूर्यकांत उर्फ बंडू याने टोळीची जबाबदारी सांभाळली. त्याने रामभाऊ पारीख यांच्या चेहऱ्यावर ज्वलनशील पदार्थ फेकला होता. तसेच बंडू याने राजकारणात प्रवेश करत निवडणूक लढवली होती.





