Pune Crime : बंडू आंदेकरची तुरुंगात नाकाबंदी! पुणे पोलीस ‘कम्युनिकेशन’ कट करणार, कोर्टात मोठा अर्ज
Pune Crime : धुळे कारागृहात मोक्काअंतर्गत बंद असलेल्या बंडू आंदेकरच्या इशाऱ्यावरून हल्ले होत असल्याचा पोलिसांना संशय; फोन आणि भेटींवर निर्बंध आणण्याची तयारी.

Pune Crime – कारागृहात बंदिस्त असतानाही शहरातील गुन्हेगारी कारवायांचे सूत्र हलवत असल्याचा संशय असलेल्या आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याची आता सर्व बाजूंनी नाकाबंदी करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. तुरुंगातील संपर्क, न्यायालयीन हालचाली आणि बाहेरील नेटवर्क यांवर निर्बंध आणण्यासाठी कारागृह प्रशासन, तसेच न्यायालयात विशेष अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
वनराज आंदेकर खून प्रकरणानंतर शहरात सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कठोर भूमिका घेतली आहे. धुळे कारागृहात मोक्काअंतर्गत बंद असलेल्या बंडू आंदेकरच्या इशाऱ्यावरूनच अनेक हल्ले घडवून आणले जात असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. आयुष कोमकर आणि गणेश काळे यांच्या हत्येनंतर नुकताच बालाजीनगर परिसरात वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर कोयत्याने सपासप वार करत गोळीबार करण्यात आला होता.
याप्रकरणी बंडू आंदेकरसह १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या वाढत्या घटनांमुळे पुणे पोलिसांनी आता थेट कम्युनिकेशन कट करण्याची रणनीती आखली आहे. बंडू आंदेकरला कारागृहातील एकांत कोठडीत ठेवणे, न्यायालयीन सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करणे, कैद्यांसाठी उपलब्ध असलेली दूरध्वनी सुविधा बंद करणे, तसेच वकिलांशिवाय इतर कोणालाही भेटण्यास मज्जाव करणे, अशा मागण्या प्रशासनाकडे करण्यात येणार आहेत.
मेलो तरी बदला घ्यायचाच
वनराज आंदेकर यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा कृष्णा आंदेकर याने मेलो तरी बदला घ्यायचाच, अशी शपथ घेतल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. यामुळे त्याने आयुष कोमकरच्या हत्येच्या गुन्ह्यात कारागृहात जाण्याआधीच वेगवेगळ्या टीम बनवून त्यांना टार्गेट दिली आहेत. त्यांच्या टोळीच्या टार्गेटवर वनराजच्या खुनातील १४ आरोपींचे कुटुंबीय असल्याची चर्चा आहे.





