पुणे – साचणाऱ्या कचऱ्याची दुर्गंधी कमी करण्याच्या नावाखाली महापालिका प्रशासनाने विनानिविदा 10 हजार 600 रुपये किलो दराने ऍरोबिक सिटी वेस्ट ट्रिटमेंट पावडर खरेदी केली आहे.
दरम्यान, मागील वर्षापर्यंत हीच पावडर अवघ्या 198 रुपये किलोदराने खरेदी केली जात होती. मात्र, आता पावडरचे नाव आणि त्यातील घटक वेगळे असल्याचे सांगत तातडीची बाब म्हणून निविदा न काढताच तब्बल 80 लाख रुपयांची पावडर खरेदी करत स्वच्छतेच्या नावाखाली पुन्हा एकदा प्रशासनाने हात “पांढरे’ केले आहेत, अशी चर्चा पालिका वर्तुळात जोरात सुरू आहे.
ओल्या कचऱ्याची दुर्गंधी पसरू नये, यासाठी यावर ही पावडर फवारणे आवश्यक असते. यामुळे कचऱ्याचे विघटन लवकर होवून खत निर्माण केले जाते.
यासाठी महापालिका दरवर्षी या पावडरची खरेदी करते. अशी पावडर तयार करणाऱ्या अनेक कंपन्या राज्यात आहेत. दरम्यान, प्रशासनाने विना निविदा आणि महापालिका अधिनियमाचा दाखला देत या पावडरच्या खरेदीस मान्यता दिली आहे. यासाठी प्रति किलो 10 हजार 600 रुपये इतका दर मोजला आहे. त्यामुळे प्रशासनाला 198 रुपये भाव असलेली ही पावडर 10 हजार रुपये किलोने घेण्याची घाई का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या पावडरचा दर 198 रुपये इतका आहे. मागील वर्षी हीच पावडर ठराव करून खरेदी करण्यात आली. ऍरोबिक सिटी वेस्ट ट्रिटमेंट पावडर व बायोविझार्ड हे दोन्ही एकच आहे. पण, प्रशासनाने वित्तीय समितीमध्ये मान्यता मिळाल्याची दिशाभूल करून नव्याने निविदा न राबवता ही 10 हजार रुपये किलोची थेट पावडर खरेदी करण्यात आली आहे. या प्रकरणी तातडीनं चौकशी व्हावी.
– अश्विनी कदम, माजी अध्यक्ष, स्थायी समिती