MHADA: एक डिसेंबरला म्हाडाची सोडत
MHADA:

उपमुख्यमंत्री पवार यांची उपस्थिती; ४,४६२ सदनिकांची सोडत
MHADA: म्हाडा पुणे विभागातर्फे दि. १ डिसेंबर रोजी सुमारे ४ हजार ४६२ सदनिकांची सोडत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे.
दरम्यान, सोडतीची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली असून, ५ हजार ३९८ अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे या सोडतीसाठी २ लाख ६८ हजार ६७० अर्ज पात्र ठरले आहेत.
पुणे मंडळातर्फे १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनांतील सदनिकांच्या वितरणासाठी २४ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती.
यामध्ये पुणे महापालिका क्षेत्रात १ हजार ४६८, पिंपरी-चिंचवड क्षेत्रात १ हजार ४०६, तर पीएमआरडीए क्षेत्रात १ हजार ५८८ अशी एकूण ४ हजार ४६२ घरांची सोडत जाहीर करण्यात आली. गेल्या दोन सोडतींमधील ५५८ शिल्लक राहिलेल्या घरांचाही यामध्ये समावेश आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी २४ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली.
या घरांसाठी तब्बल ३ लाख २५ हजार ७७ जणांनी अर्ज केला, तर प्रत्यक्ष सोडतीत सहभाग झालेल्यांची संख्या २ लाख ७४ हजार ४०८ आहे. अपात्र अर्जदारांमध्ये प्रामुख्याने उत्पन्नाचा चुकीचा दाखला देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या अर्जदारांना योग्य कागदपत्रे जमा करण्यासाठी एक दिवसाची मुदत दिली होती. या सोडतीची अंतिम यादी शुक्रवारी (दि. २७) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.





