Encroachment: वारजे-कर्वेनगरमध्ये बुलडोझर; दोन दिवसांत ३८ हजार स्क्वे. फूट जागा मोकळी
Encroachment:

Encroachment: वारजे आणि कर्वेनगर परिसरातील बेकायदा अतिक्रमणांवर पुणे महापालिकेने सलग दोन दिवस धडक कारवाई करीत व्यावसायिकांचे धाबे दणाणून सोडले आहे.
पादचाऱ्यांचा श्वास कोंडणारे पदपथ आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे फ्रंट मार्जिन मोकळे करण्यासाठी प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला असून, या कारवाईत तब्बल ३८ हजार ४०० स्क्वेअर फूट अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त, शहर अभियंता तसेच अतिक्रमण, पथ आणि आकाशचिन्ह विभागाच्या उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्त अस्मिता तांबे यांनी ही धडक मोहीम हाती घेतली आहे.
कारवाईच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि. २३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून वारजे उड्डाण पूल आणि पुढे डुक्कर खिंडीपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रस्त्यांवर जेसीबी चालवण्यात आला. या भागातील पदपथ आणि फ्रंट मार्जिनवरील १८ हजार ४०० स्क्वेअर फुटांचे अनधिकृत बांधकाम हटवून रस्ते मोकळे करण्यात आले.
मंगळवारी (दि. २४) या मोहिमेची व्याप्ती वाढवत करिश्मा सोसायटी ते क्वालिटी हॉटेल, पाणंद रस्ता तसेच कमिन्स कॉलेज व शाहू कॉलनी परिसरात कारवाईचा बडगा उगारण्यात आला. येथेही २० हजार स्क्वेअर फूट अतिक्रमण हटवून प्रशासनाने दणका दिला.
पोलीस बंदोबस्त, जेसीबी यंत्रणा आणि महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई करण्यात आली. प्रशासनाच्या या आक्रमक भूमिकेमुळे परिसरातील अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले असून, काही व्यावसायिकांनी कारवाईत दुजाभाव का? आमच्यावर कारवाई केली तर सरसकर सगळ्यांवर कारवाई का नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
काही ठिकाणी कारवाई करून पथक गेल्यावर पुन्हा अतिक्रमण करण्यास सुरवात झालेल्या ठिकाणी महापालिकेच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारला. दरम्यान, या कारवाईमुळे नागरिकांनी मात्र मोकळ्या झालेल्या रस्त्यांबद्दल समाधान व्यक्त केले आहे.





