pune: शहरात थंडीचा जोर ओसरला
pune:

Pune: मागील चार ते पाच दिवसांपासून हुडहुडी भरवणाऱ्या कडाक्याच्या थंडीने गारठलेल्या पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. शहरात आणि जिल्ह्यात वेगाने ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरलेला थंडीचा पारा गेल्या ४८ तासांत त्याच झपाट्याने वाढला आहे. मंगळवारी शहरातील किमान तापमानाने १४ अंशांचा पुढे नोंदवले असून, थंडीचा जोर ओसरला आहे.
शहरासह उपनगरांत दोन दिवसांपासून हवामानात बदल झाल्याने कडाक्याची थंडी कमी झाली आहे. सध्या शहराच्या पश्चिम भागातील उपनगरासह जिल्ह्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी पहाटे आणि रात्रीच्या वेळी हलका गारवा जाणवत आहे. मंगळवारी (दि. २४) एनडीए परिसरात सर्वात कमी म्हणजे १४.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
जिल्ह्यातील माळीण येथे १४.९, हवेली १५.१, शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजीनगर येथे १६.२ आणि पाषाण येथे १६.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. जिल्ह्यात बारामती १६.६, इंदापूर १७.६, तर शहरी भागातील हडपसर १८ आणि मगरपट्टा व चिंचवड परिसरात सर्वाधिक १९.४ अंश सेल्सिअस किमान तापमान राहिले.
पुढील दोन दिवस शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील हवामान मुख्यतः कोरडे राहील. तर किमान तापमानात काही अंशी वाढ होण्याची शक्यता असून, केवळ तुरळक ठिकाणीच तापमानात किंचित घट पाहायला मिळेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.





