Pune Miraj Railway: पुणे-मिरज रेल्वे मार्गावर मोठा बदल! आता ट्रेन चुकली तरी अपघात होणार नाही; रेल्वेने आणले ‘हे’ नवीन तंत्रज्ञान
Pune Miraj Railway: मानवी चुकांमुळे होणारे रेल्वे अपघात रोखण्यासाठी पुणे विभागाचे मोठे पाऊल; वेग मर्यादेचे उल्लंघन झाल्यास ट्रेन स्वयंचलितपणे थांबणार.

Pune Miraj Railway – भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाला गती देताना प्रवाशांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी पुणे विभागातील पुणे-मिरज रेल्वे मार्गावर पहिली स्वदेशी बनावटीची कवच स्वयंचलित प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित केली आहे. गाडी क्रमांक ०१०२३ पुणे-एससीएसएमटी कोल्हापूर विशेष रेल्वे गाडीला ही प्रणाली जोडून कवचचा अधिकृत प्रारंभ नुकताच करण्यात आला.
यावेळी पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा आणि अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ तांत्रिक पथक, अधिकारी उपस्थित होते. पुणे रेल्वे विभागाच्या इतिहासातील ही पहिलीच यशस्वी चाचणी असून यामुळे प्रवास आता पूर्णपणे सुरक्षित झाला आहे. कवच ही पूर्णपणे भारतात विकसित केलेली (स्वदेशी) अत्यंत प्रगत स्वयंचलित रेल्वे संरक्षण प्रणाली आहे. ही यंत्रणा रेल्वेच्या सुरक्षित संचालनासाठी महत्त्वाची भूमिका बजावते आणि गाडीच्या हालचालींवर तसेच वेगावर बारीक लक्ष ठेवते.
निर्धारित वेगमर्यादा आणि रेल्वे संचालनाच्या नियमांचे अचूक पालन करण्यासाठी ही यंत्रणा लोको पायलटला सतत डिजिटल संदेशांद्वारे मदत करते. या प्रणालीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे धावत्या रेल्वेचा वेग मर्यादेपेक्षा जास्त झाल्यास किंवा एकाच ट्रॅकवर समोरून दुसरी गाडी येण्याचा धोका निर्माण झाल्यास, अपघातांची शक्यता टाळण्यासाठी ही प्रणाली तातडीने स्वयंचलितपणे (ऑटोमॅटिक) ब्रेक लावून रेल्वे थांबवते. परिणामी मानवी चुकीमुळे होणारे मोठे रेल्वे अपघात रोखण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्वपूर्ण आहे.
“भविष्यात विभागातील इतर काही निवडक महत्त्वाच्या मार्गांवरही कवच प्रणालीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाईल. यामुळे प्रवासी गाड्यांसोबतच मालगाड्यांचीही परिचालन सुरक्षा, विश्वासार्हता आणि रेल्वे वाहतूक अधिक वेगवान व सुरक्षित होण्यास मोठी मदत होईल.”
– राजेशकुमार वर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे





