Kanhe Railway Station : रेल्वे स्थानक की कचरा डेपो? अंदर मावळातील कान्हे स्थानकाची दयनीय अवस्था; प्रवाशांचा संताप
Kanhe Railway Station : औद्योगिक आणि शैक्षणिक विस्तार होऊनही प्रवासी सुविधेच्या नावाखाली ठणठणाट; पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतेची भीषण टंचाई.

Kanhe Railway Station – अंदर मावळातील कान्हे रेल्वे स्थानकावर मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव आणि वाढत्या अस्वच्छतेमुळे यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. औद्योगिक, शैक्षणिक आणि व्यावसायिकदृष्ट्या वेगाने वाढणाऱ्या या परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक रेल्वे प्रवास करतात. मात्र स्थानकावरील परिस्थिती पाहता सुविधा आणि व्यवस्थापनाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कान्हे परिसरातून मोठ्या संख्येने कामगार वर्ग दररोज टाकवे एमआयडीसीकडे लोकलने प्रवास करतो.
याशिवाय साते, नायगाव, अहिरवडे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शासकीय आअणि खासगी कंपन्यांतील कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच दुग्ध व्यवसायिक मोठ्या प्रमाणात या स्थानकाचा वापर करतात. पिंपरी-चिंचवड विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थीही कान्हे स्थानकावरून प्रवास करतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि शैक्षणिक संधींमुळे येथील प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत स्थानकावरील सुविधा अत्यंत अपुऱ्या असल्याचे चित्र आहे.
सर्वात मूलभूत गरज असलेली पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय स्थानकावर उपलब्ध नाही. उन्हाळ्यात प्रवाशांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. परिसरात सर्वत्र कचरा साचलेला दिसतो. प्लॅटफॉर्मवर आणि परिसरात दुर्गंधी पसरल्याने प्रवाशांना उभे राहणेही कठीण होत असल्याच्या तक्रारी आहेत. वाढती प्रवासी संख्या आणि परिसरातील औद्योगिक-शैक्षणिक विस्तार लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय उभारणी, तिकीट सुविधेचे आधुनिकीकरण तसेच सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. कान्हे रेल्वे स्थानक हे अंदर मावळातील प्रमुख दुवा असल्याने येथे मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
स्थानकावर स्वच्छतागृहांचा अभाव
महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शौचालयाचा अभाव ही गंभीर समस्या ठरत आहे. प्रवाशांना मूलभूत स्वच्छतागृह सुविधा नसल्याने गैरसोय सहन करावी लागते. याशिवाय रात्रीच्या वेळी स्थानक परिसरात काही व्यसनाधीन व्यक्तींची वर्दळ वाढत असल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सोबतच महिलांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये याबाबत भीतीचे वातावरण आहे.
तिकीट खिडकीवर रांगाच रांगा
परतीच्या तिकिटांसाठी स्वतंत्र सुविधा नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. गर्दीच्या वेळेत तिकीट खिडकीवर मोठ्या रांगा लागतात. डिजिटल तिकिट सुविधा किंवा स्वयंचलित यंत्रणा उपलब्ध नसल्याने वेळेवर तिकीट मिळण्यात अडथळे निर्माण होतात.
फलाटांवर कचऱ्यांचे ढीग
वाढत्या गर्दीच्या तुलनेत स्थानकावरील स्वच्छतेची अवस्था अत्यंत दयनीय आहे. प्लॅटफॉर्मवर आणि प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. प्लास्टिकच्या बाटल्या, अन्नपदार्थांचे अवशेष आणि इतर कचरा दिवसानुदिवस न उचलल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. स्थानकावर नियमित स्वच्छता मोहीम न राबवल्याने अस्वच्छतेचा विळखा अधिकच घट्ट होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
“रेल्वे स्थानकावरून साते आणि अंदर मावळ भागातील मोठ्या संख्येने दुग्ध व्यवसायिक आणि नोकरदार वर्ग प्रवास करतो. औद्योगिक कंपन्यांमुळे स्थानकावरील प्रवासी संख्या मोठी आहे. मात्र स्थानकावर दुर्गंधी, अस्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याचा अभाव आहे. शौचालय आणि तिकीट सुविधांबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.”
– तुकाराम आगळमे, प्रवासी





