प्रभात वृत्तसेवा पुणे – मध्य रेल्वे विभागातील महत्वकांक्षी प्रकल्प असलेला पुणे-मिरज या २८० किलोमिटर लोहमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले. त्यामुळे या मार्गावरील गाड्यांचा वेग वाढणार असून, या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्यामुळे प्रवाशांची अधिक सोय होणार आहे.पुणे ते मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. आता भविष्यात रेल्वे गाड्यांची संख्याही वाढणार आहे. मध्य रेल्वेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०१६ मध्ये सुरू झाला. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ६ नोव्हेंबरला (सीएमआर) पाहणी करून मार्गावर रेल्वेची चाचणी घेतली. यावेळी १३० किमी प्रतीतास वेगाने गाडी धावली. त्यानंतर दुहेरीकरण पूर्ण झाल्याने प्रवासी वाहतुकीबरोबरच, मालवाहतूक गाड्यांचा वेग वाढणार आहे.पुणे-मिरज मार्गावरील कोरेगाव-रहिमतपूर-तारगाव या अखेरच्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे. मध्य रेल्वेने २०१६ मध्ये या मार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाच्या कामाला सुरवात केली. मे २०२३ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, करोनामुळे कामाची गती मंदावली. तसेच जुन्या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणात अनेक अडचणी येत होत्या. काही ठिकाणी भूसंपादनासाठी विरोध झाल्यामुळे कामात अडथळे आले. परिणामी काम पूर्ण होण्यास वेळ लागला. पुणे-मिरज मार्गावर दिवसाला सहा एक्स्प्रेस, तर तीन पॅसेंजर धावतात. आठवड्यातून एकदा आणि साप्ताहिक ११ एक्स्प्रेस धावतात. या मार्गावर प्रामुख्याने दररोज महालक्ष्मी, महाराष्ट्र एक्स्प्रेस, कोयना आणि वंदे भारत या गाड्या धावतात. आता या मार्गावरील रेल्वेचा प्रवास जलद होणार असून, दुहेरीकरणामुळे कोल्हापूर, मिरज मार्गे बंगळुरू आणि बेळगावला जाणाऱ्या रेल्वेंची संख्या वाढू शकते.