Pune Traffic Solution: पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार! नितीन गडकरींच्या हस्ते ३ मोठ्या उन्नत मार्गांचे भूमिपूजन
Pune Traffic Solution: पुणे-शिरूर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि हडपसर-यवत या तीन नावीन्यपूर्ण उन्नत मार्ग प्रकल्पांचे पुण्यात भूमिपूजन.

Pune Traffic Solution – देशातील सर्वाधिक वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असलेल्या चार-पाच शहरांच्या यादी पुणे शहराचा समावेश आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रदूषणाचीही समस्या गंभीर बनू लागली आहे. हे प्रश्न सोडविण्याला अधिक प्राधान्य देण्यासाठी तीन महत्त्वपूर्ण उन्नत मार्ग प्रकल्प हाती घेण्यात आले आहे, असे केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
गणेश कला क्रीडा मंच येथे पुणे- शिरूर, तळेगाव- चाकण- शिक्रापूर, हडपसर- यवत या तीन उन्नत मार्गांच्या प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, महापौर मंजुषा नागपुरे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे,
आमदार उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, विक्रम काकडे, भीमराव तापकीर, राहुल कुल, बापूसाहेब पठारे, सुनील कांबळे, चेतन तुपे, सुनील शेळके, बाबाजी काळे, हेमंत रासने, शंकर मांडेकर, शंकर जगताप, ज्ञानेश्वर कटके, पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, विभागीय आयुक्त शीतल तेली- उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.
पुणे आणि मुंबईतील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी वाहतूक शहराबाहेरून वळविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सुरत-नाशिक-अहिल्यानगर-सोलापूर या नव्या महामार्गांमुळे उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी सुमारे ४० ते ४५ टक्के वाहतूक पुणे आणि मुंबईत प्रवेश करणार नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. नाशिक फाटा ते खेड या ३० किलोमीटर लांबीच्या सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून,
भूसंपादन पूर्ण होताच कामाला सुरुवात केली जाईल. खंबाटकी घाटातील नवीन बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात असून, त्याचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे. जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ठाणे ते पुणे आणि पुढे शिरूरमार्गे छत्रपती संभाजीनगरपर्यंत जोडणाऱ्या सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या नव्या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक क्षमता केंद्रांचे प्रमुख केंद्र बनण्याच्या मार्गावर असून, सन २०३० पर्यंत पुणे हे देशातील अत्यंत आधुनिक शहर व प्रमुख विकास केंद्र (ग्रोथ इंजिन) म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शहराची वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बांधा, वापरा व हस्तांतरित करा तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या तीन नावीन्यपूर्ण प्रकल्पांतून शासनाला एकूण ९५० कोटी रुपयांचा आगाऊ निधी प्राप्त होणार आहे.






