पुणे : आणखी चार मार्गांवर मेट्रो!

पुणे – पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या हद्दीत (पीएमआरडीए) मेट्रोचे जाळे विस्तारण्याची तयारी महामेट्रोने सुरू केली आहे. स्वारगेट ते खडकवासला, वारजे ते स्वारगेट, वाघोली ते पवार वस्ती (हिंजवडी) आणि चांदणी चौक ते हिंजवडी असे हे चार “पीएमआरडीए’ने वाहतूक आराखड्यात सुचविले आहेत. मेट्रोसाठी आवश्यक प्रवासीसंख्या नसल्याने त्यापेक्षा कमी खर्चामध्ये हे पर्याय प्रस्तावित केले आहेत. मेट्रो आणि लाईट मेट्रो असे मिळून सुमारे 195 किलो मीटर लांबीचे मेट्रो प्रकल्पाचे जाळे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यासाठी पीएमआरडीएने हद्दीचा करून घेतलेल्या सर्वंकष वाहतूक आराखड्यातील मार्गांची माहिती महामेट्रोने मागविली आहे. या माहितीच्या अधारे प्रस्तावित करण्यात आलेल्या मार्गांचे सर्व्हेक्षण करून त्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट, वनाज ते रामवाडी आणि हिंजवडी ते शिवाजीनगर या तीन मेट्रो मार्गाचे शहरात काम सुरु आहे. तर पीएमआरडीएने सुमारे सात हजार 200 चौरस किलोमीटर लांबीच्या क्षेत्रफळाचा ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ (सीएमपी) तयार केला आहे. त्यामध्ये मेट्रो, मोनो रेल, लाइट रेल, रिंगरेल आणि बीआरटी, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, नवीन बस डेपो, रेल्वे स्टेशनचे अद्यावतीकरण, नवीन रस्ते विकसित करणे या प्रकल्पांसह प्रमुख चौकांचे रुंदीकरण असा सुमारे 54 हजार 601 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची शिफारस आराखड्यात केली आहे.
सर्व्हेक्षणासाठी आवश्यक माहिती महामेट्रोने मागितली
सद्यःस्थितीत हिजंवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम पीएमआरडीएने हाती घेतले आहे. तर या मार्गाचे लोणीकाळभोर आणि सासवडपर्यंत विस्तारीकरणाचे कामदेखील “पीएमआरडीए’कडेच देण्यात आले आहे. मात्र, उर्वरीत जे मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. ते विकसित करण्याची जबाबदारी यापूर्वीच महामेट्रोकडे देण्यात आली आहे. त्यानुसार उर्वरीत मेट्रो मार्गांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी आवश्यक ती माहिती आणि परवानगी महामेट्रोने “पीएमआरडीए’कडे मागितली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) कार्यकारी संचालक पी. के. आचार्य यांनी त्यासंदर्भात “पीएमआरडीए’ला पत्र पाठविले आहे.





