Pune Lok Adalat: कर्ता गमावलेल्या कुटुंबाला मिळाला वर्षात न्याय! भरपाईपोटी मिळणार १ कोटी १० लाख; लोकअदालतमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय
Pune Lok Adalat: मृत शासकीय कर्मचाऱ्याचे वय, पगार अन् अवलंबून असलेल्या कुटुंबाचा विचार करून न्यायाधिकरणाचा दिलासादायक निर्णय.

Pune Lok Adalat – घरातील कर्ता व्यक्ती असलेल्या शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुबियांना दावा दाखल केल्यापासून वर्षात दिलासा मिळाला आहे. त्यांना १ कोटी १० लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. शनिवारी (दि.१२) झालेल्या लोकअदालतमध्ये मोटार अपघात न्यायाधिकरणाचे प्रमुख सदस्य जिल्हा न्यायाधीश आर.के. राजेभोसले, ॲड. अतुल गुंजाळ यांच्या पॅनलसमोर तडजोडीअंती हा दावा निकाली निघाला.
तडजोडीसाठी अर्जदारांचे वकील ॲड. पांडुरंग निवृत्ती बोबडे, ॲड. प्रज्वल गुंजाळ, रॉयल सुंदरम इन्शुरन्स कंपनीचे वकील ॲड. ऋषिकेश गानू, कंपनीचे राष्ट्रीय प्रबंधक आशिष राऊत, मुख प्रबंधक अभिषेक डबली, अधिकारी भारत केदारे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ३२ वर्षीय माधव (नाव बदलले आहे) यांच्या मृत्यूप्रकरणी पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई वडिलांनी दीड कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळावी,
यासाठी मोटार अपघात न्यायाधिकरण येथे ॲड. पांडुरंग निवृत्ती बोबडे आणि ॲड. प्रज्वल गुंजाळ यांच्यामार्फत सप्टेंबर २०२५ मध्ये दावा दाखल केला होता. आयशरची विमा कंपनी असलेल्या रॉयल सुंदरम इन्शुरन्सच्या विरोधात हा दावा दाखल केला होता. ३० जुलै २०२५ रोजी द्रुतगती महामार्गावरून माधव दुचाकीवरून सातारा येथून पुण्याकडे येत होते.
त्यावेळी समोरून डिव्हायडर तोडून रॉंग साईडने आलेल्या आयशरने माधव यांच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी इतर दोन दुअचाकी आणि एका पिकअपलाही आयशरने धडक दिली होती. अपघातत माधव यांचा मृत्यू झाला. ते ३२ वर्षांचे होते. शासकीय सेवेत त्यांना दरमहा ७७ हजार २७६ रुपये पगार मिळत असे.
त्यांचे वय, पगार आणि अवलंत्वाचा विचार करता अधिकाधिक नुकसान भरपाई देण्याची मागणी दाव्यात करण्यात आली होती. हा दावा तजजोडीसाठी लोकअदालतमध्ये ठेवला होता. यामध्ये वरील तडजोड झाली. तडजोडीच्या रक्कमेचा धनादेश प्रमुख पुणे जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांच्या उपस्थितीत देण्यात आला.





