Pune Court News : हडपसर पोलिसांना दणका! कारणे न देता केलेली अटक अवैध; आरोपीस तात्काळ मुक्त करण्याचे न्यायालयाचे आदेश
Pune Court News :

Pune Court News : खंडणीतील आरोपीला अटक करताना कारणे न देणे हडपसर पोलिसांना महागात पडले आहे. आरोपीची तात्काळ मुक्तता करण्याचे आदेश लष्कर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी योगेंद्र कवडे यांनी दिले आहेत.
या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ॲड. अजित पवार आणि ॲड प्रणित नामदे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. वेदांत म्हैसकर आणि ॲड. अक्षय नामदे यांनी सहकार्य केले.
अमोल राजपूत असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात खंडणी आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याच्या कलमानुसार हडपसर पोलीस स्टेशन येथे ५ मार्च २०२६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्याला अटक करून पोलिसांनी ६ मार्च रोजी लष्कर न्यायालयात कोठडीसाठी हजर केले.
त्यावेळी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २२ (१) नुसार आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांना अटक करताना लिखित स्वरूपात कारणे देणे बंधनकारक आहे. हा आरोपीचा मूलभूत अधिकार आहे.
या प्रकरणात पोलिसांनी कायद्याने घालून दिलेल्या कुठल्याही निकषांची पूर्तता केलेली नाही, ही बाब आरोपीचे वकील ॲड. अजित पवार आणि ॲड प्रणित नामदे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
तर आरोपी विरोधात खुनासह विविध स्वरूपाचे इतर २२ खटले प्रलंबित असल्याचा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला. मात्र, न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला तात्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले.





