Pune News: “कर्कश आवाज वाढला, ही आमचीच चूक!” पुणे जिल्हा साउंड असोसिएशनची थेट कबुली
Pune News: गणेश मंडळांनी मागणी केली तरी चार बेस अन् चार टॉपच्या पुढे जाणार नाही; प्रशासकीय चौकटीत व्यवसाय करण्याची ग्वाही.

Pune News – लॉकडाउननंतर साउंड व्यवसायाला शिथिलता मिळाल्याने स्पर्धा वाढली. प्रेशर मिडची संख्या वाढल्याने कर्कश आवाजही वाढला. ही आमच्याकडून झालेली चूक आहे, अशी स्पष्ट कबुली पुणे जिल्हा साउंड, लाइट, जनरेटर सिस्टिम असोसिएशनने दिली आहे. या वर्षीपासून प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांनुसारच व्यवसाय करू, असे सांगत आजपर्यंत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचीही एकप्रकारे त्यांनी कबुली दिली आहे.
पुणे जिल्हा साउंड, लाइट, जनरेटर सिस्टिम असोसिएशनचे अध्यक्ष गणेश काळभोर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत त्यांची बाजू मांडली. या वेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर सुतार, कार्याध्यक्ष ओंकार पडवळ, कायदेशीर सल्लागार मोहित पालेशा, रिपब्लिकन परिवर्तन पँथरचे अध्यक्ष गजेंद्र मोरे उपस्थित होते. जिल्ह्यातील गणेश मंडळांनी प्लाझ्मा सिस्टिम किंवा प्रेशर मिडची मागणी केली,
तरी ती देणार नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत दोन मंडळे समोरासमोर आल्यानंतर आवाजाची स्पर्धा सुरू होते. मंडळांकडून आवाज वाढवण्यासाठी साउंड व्यावसायिकांवर दबाव येतो. त्यामुळे प्रेशर मिडची संख्या वाढली, ही गोष्ट आम्ही मान्य करतो. दोन बेस एकत्र करून प्लायवूड लावून जे केले जायचे, त्याला लोकांनी प्लाझ्मा नाव दिले, ती एकप्रकारे पळवाट होती, असेही काळभोर म्हणाले.
दोन मंडळांच्या साउंड सिस्टिममध्ये स्पर्धा होऊ नये, यासाठी संघटनेने स्पर्धामुक्त पुणे करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळांनी आवाज वाढविण्यासाठी दबाव आणला, तरी आम्ही आवाज वाढवणार नाही. चार बेस आणि चार टॉपच्या पुढे जाण्याची आमची मानसिकता नाही. पोलीस प्रशासनाने दिलेली परवानगी आणि नियमांच्या चौकटीत आम्ही व्यवसाय करू, असे आश्वासन काळभोर यांनी दिले. साउंड व्यावसायिकांच्या समर्थनार्थ येत्या काही दिवसांत संभाजी पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढू, असे मोरे यांनी सांगितले.
“दरवर्षी गणेशोत्सव आला, की साउंड बंद करण्याची मागणी सुरू होते. त्यामुळे व्यवसायाचे नियोजन करणे अवघड होते. प्रशासनाने एकदाच स्पष्ट नियम ठरवून आम्हाला व्यवसाय करू द्यावा.”
– गणेश काळभोर, अध्यक्ष, साउंड सिस्टिम असोसिएशन






