Pune News : हायटेन्शन वीजवाहिनीचा शॉक; झाडावर अडकलेल्या २० वर्षीय तरुणाची थरारक सुटका
Pune News : पुण्यातील कात्रज येथील भारती हॉस्पिटल रोड परिसरात मंगळवारी दुपारी झाडांची छाटणी करताना एक अंगावर काटा आणणारी घटना घडली.

Pune News : भारती हॉस्पिटल रोड परिसरात मंगळवारी दुपारी झाडांची छाटणी करताना हायटेन्शन वीजवाहिनीचा स्पर्श झाल्याने २० वर्षीय रितेश सुरेश निखारे हा तरुण गंभीर जखमी झाला. विजेच्या धक्क्यानंतर तो झाडाच्या दोन फांद्यांमध्ये अडकून पडल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. (Pune News)
कात्रज अग्निशमन केंद्राच्या जवानांनी जीवाची पर्वा न करता केलेल्या धाडसी बचावामुळे त्याला सुखरूप खाली उतरवून तातडीने भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. (Pune News)
दुपारी २.५७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचल्यानंतर जवानांनी फायर वाहनावर चढून सिंगल पार्ट शिडीच्या साहाय्याने झाडापर्यंत पोहोचत दोरीने रितेशला सुरक्षित बांधले आणि अत्यंत सावधगिरीने खाली उतरविले. (Pune News)
या मोहिमेत प्रभारी उपअग्निशमन अधिकारी संतोष भिलारे तसेच फायरमन प्रशांत कुंभार, अक्षय देवकर, योगेश कुंभार आणि मयुर काटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. (Pune News)
दरम्यान, ही झाडछाटणी नेमकी कोणाच्या आदेशाने सुरू होती, याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत संभ्रम कायम होता. हे काम भारती विद्यापीठ, महावितरण, महापारेषण किंवा अन्य कोणत्या यंत्रणेच्या वतीने सुरू होते, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. (Pune News)
पोलिसांकडेही या घटनेची अधिकृत नोंद उशिरापर्यंत पोहोचली नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाकडूनही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. (Pune News)
झाडांची छाटणी करण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाची परवानगी आवश्यक असते, तर हायटेन्शन वीजवाहिन्यांच्या परिसरातील झाडांची छाटणी प्रामुख्याने महापारेषणमार्फत केली जाते, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. (Pune News)
या घटनेमुळे सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, संबंधित तरुणाकडे आवश्यक सुरक्षासाहित्य होते का आणि काम अधिकृत परवानगीनेच सुरू होते का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित यंत्रणांकडून याबाबत स्पष्टीकरणाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (Pune News)





