Pune news : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; धडक देऊन वाहनचालक पसार
या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला.

Pune news – कात्रज-वारजे बाह्यवळण पुलावर भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर जखमीला मदत न करता वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला.
बसप्पा निवृत्ती बंडगर (वय ५१, रा. दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. या प्रकरणी सारंग चंद्रकांत खुटाळे (वय २५, रा. महर्षीनगर, पुणे) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बसप्पा बंडगर हे फिर्यादी यांचे मामा होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बंडगर हे कात्रज-वारजे बाह्यवळण पुलावरून दुचाकीवरून जात होते.
त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. वारजे माळवाडी पोलिस पुढील तपास करीत आहेत.






