Pune Innovation City: बंगळुरू-हैदराबादलाही मागे टाकणार पुणे! पीएमआरडीएची मोठी बैठक; पाहा काय आहे नवा प्लॅन
Pune Innovation City: पुणे परिसराचा बंगळुरू आणि हैदराबादच्या धर्तीवर प्रमुख 'ग्रोथ अँड इनोव्हेशन हब' म्हणून विकास करण्यासाठी पीएमआरडीएमध्ये उच्चस्तरीय बैठक.

Pune Innovation City – पुणे परिसराचा बंगळुरू आणि हैदराबादच्या धर्तीवर प्रमुख ग्रोथ आणि इनोव्हेशन हब म्हणून विकास केला जाणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून हा विकास केला जाणार आहे. राज्य शासनाने पुणे इनोव्हेशन हबची निवड हाय इम्पॅक्ट इनिशिएटिव्ह अर्थात समाज आणि अर्थव्यवस्थेवर परिणामकारक प्रकल्प म्हणून केली आहे.
या माध्यमातून या नियोजनाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चेसाठी १५ जुलैला सर्व विभागांची पीएमआरडीएमध्ये बैठक झाली. यामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए आणि उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश असून, त्या अनुषंगाने कामे होणार आहेत. वाहतूक कोंडी आणि पायाभूत सुविधांतील अडचणी दूर करण्यासाठी प्रकल्पाचा सर्वसमावेशक मास्टर प्लॅन बनविण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
यासाठी आवश्यक जागांची चाचपणी करणे, भविष्यातील रोजगाराच्या संधींचा अंदाज घेऊन स्वतंत्र रोडमॅप तयार करण्यासंदर्भात कामे सुरू झाली आहेत. या प्रकल्पाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी आणि सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधण्यासाठी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन यांच्या बैठकीनुसार सर्व विभाग काम करतील.
विशेष म्हणजे या प्रकल्पाच्या देखरेखीसाठी पीएमआरडीएतर्फे स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी मुंबईच्या धर्तीवर पुण्यालाही इनोव्हेशन सिटी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी ब्रँड पुणेची निर्मिती केली जाईल. बंगळुरूच्या धर्तीवर टेक समिटही आयोजित केले जाणार आहे.



