Bridge Collapse: पहिल्याच पुरात कोसळला कोट्यवधींचा पूल! पीएमआरडीएच्या कामावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी
Bridge Collapse: माजी खासदार आढळराव पाटलांच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेला १८ ते २४ कोटींचा पूल पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कोसळला.

Bridge Collapse – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून हवेली तालुक्यातील हिंगणगाव ते खामगाव टेक जोडणार्या नदीवरील पुलाच्या बांधकामाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सुमारे 18 ते 24 कोटी रुपये खर्चाच्या या पुलाचा काही भाग पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आलेल्या पुरात कोसळल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत शंका व्यक्त होत आहे.
घटनास्थळी पाहणी केल्यानंतर शिवसेनेचे युवा नेते अलंकार बाळासाहेब कांचन पाटील यांनी बांधकामातील कथित अनियमिततेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अलंकार कांचन यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे की, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नांनंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात या पुलास मंजुरी मिळाली होती.
पीएमआरडीएकडून संबंधित ठेकेदार कंपनीला हे काम 18 महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, जोडरस्ता पूर्ण होण्यापूर्वीच पहिल्याच पुराच्या तडाख्यात पुलाचे स्लॅब आणि खांब कोसळल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी त्यांनी ठेकेदार आणि संबंधित अधिकार्यांवर गंभीर आरोप करत, कथित कमिशन पद्धतीमुळे निकृष्ट दर्जाची कामे होत असल्याचा आरोप केला. पुलाचा काही भाग कोसळल्यानंतरही संबंधित अधिकारी किंवा ठेकेदारांनी घटनास्थळी भेट दिली नसल्याचा दावाही त्यांनी केला.
लोकप्रतिनिधी विकासकामांसाठी निधी आणतात; मात्र भ्रष्टाचारामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असून सरकारची प्रतिमाही मलिन होत आहे, असे सांगत अलंकार कांचन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान भ्रष्टाचार व निकृष्ट कामाचे आरोप हे संबंधित नेते आणि स्थानिकांनी केलेले असून, त्याबाबत पीएमआरडीए, संबंधित ठेकेदार कंपनी किंवा प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.





