PMRDA News: उद्योजकांसाठी मोठी बातमी! पीएमआरडीए सुरू करणार विशेष ‘फॅसिलिटेशन सेंटर’; परवानग्यांना मिळणार गती
PMRDA News: सर्व विकास परवानग्या आता १०० टक्के ऑनलाईन 'BPMS' प्रणालीद्वारे; चाकण, हिंजवडी, रांजणगाव औद्योगिक संघटना प्रतिनिधींसोबत महत्त्वाची बैठक.

PMRDA News- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी आणि उद्योजकांच्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी प्राधिकरणाच्या वतीने विशेष ‘फॅसिलिटेशन सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे. महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. १३) आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या मुख्यालयात औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.
यावेळी याबाबतचा निर्णय आयुक्त चौधरी यांनी जाहीर केला. या बैठकीत विकास परवानग्या, अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी व्यवस्थापन प्रणालीतील (बीपीएमएस) अडचणी, शुल्क आकारणी, आवश्यक कागदपत्रे आणि प्रलंबित औद्योगिक प्रस्तावांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आणि चाकण, हिंजवडी,
रांजणगाव, तळेगाव, पिरंगुट येथील औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. औद्योगिक प्रस्तावांवरील कार्यवाही अधिक पारदर्शक करण्यासाठी १०० टक्के ऑनलाइन बीपीएमएस प्रणालीद्वारेच प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले.
या प्रक्रियेत उद्योजक आणि वास्तुविशारदांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पीएमआरडीएचे अधिकारी आणि बीपीएमएस प्रतिनिधी यांच्या समन्वयातून फॅसिलिटेशन सेंटर कार्यान्वित केले जाईल. तसेच, परवानग्यांसाठी आकारण्यात येणारे शुल्क, आवश्यक कागदपत्रांची यादी आणि इतर महत्त्वाची माहिती औद्योगिक संघटनांना उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
रस्ते, वाहतूक आणि अग्निशमन सुविधांवर भर
औद्योगिक परिसरातील वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि मूलभूत सुविधांचा अभाव या समस्याही बैठकीत मांडण्यात आल्या. प्राधान्याने दुरुस्ती करावयाच्या रस्त्यांची यादी औद्योगिक संघटनांकडून मागविण्यात आली आहे. याशिवाय अवजड वाहनांसाठी ट्रक टर्मिनस उभारणे आणि औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक जागा निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले.





