PUNE: सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या खांबावर ‘हातोडा’; बांधकामात त्रुटी राहिल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण

पुणे – सिंहगड रस्त्यावर सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यातील एका खांबाचा जवळपास तीन मीटर भाग रविवारी रात्री तोडण्यात आला. खांब उभारताना त्यात भरण्यात आलेले कॉंक्रीट योग्य दर्जाचे नसल्याने ही कारवाई केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
पूर्ण खांबाची तपासणी करण्यात आलेली असून केवळ अडीच ते तीन मीटरचा वरचा भागच तोडण्यात आल्याचे प्रकल्प विभागाचे प्रमुख श्रीनिवास बोनाला यांनी सांगितले. आधीच या उड्डाणपुलाची मार्गिका चुकल्याची चर्चा असतानाच आता अचानक उभा केलेला खांब पाडण्यात आल्याने या पुलाच्या कामाबाबतच शंका उपस्थित केली जात आहे.
या खांबाचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे, या उद्देशाने 35 ग्रेडचे कॉंक्रीटीकरण आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात ते 30 ग्रेडचे असल्याचे खांबाच्या भागाच्या तपासणीत आढळून आले. खांबाचे काम करण्यापूर्वी त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मिक्स मटेरियलचे नमुने घेतले जातात. तसेच खांब भरल्यानंतर सातव्या, 14 च्या आणि 28 व्या दिवशी त्याच्या कॉंक्रीटचे नमुने तपासले जातात. या तपासणीत हा उभारण्यात आलेला खांबाचा वरचा भाग मजबूत नसल्याचे आढळले आहे. त्यामुळे, पुढील काम करता येणार नसल्याने हा खांब पाडण्याचा निर्णय घेण्यात आला.
मनसेने वाहिली श्रद्धांजली
रविवारी रात्रीत प्रशासनाने गुपचूपपणे हा खांब तोडून काढल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने या खांबाच्या ठिकाणी निषेधाचे फलक लावत या खांबास प्रतीकात्मक श्रद्धांजली वाहत अनोखे आंदोलन केले. मनसेचे माजी गटनेते वसंत मोरे यांच्यासह वाहतूक सेनेचे शिवाजी मते, तसेच स्थानिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. खांबाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यानेच ते काढण्यात आल्याचा दावा यावेळी करण्यात आला. यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली. या प्रकरणी संबंधित ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस देऊन कारवाई करावी, अशी मागणी मोरे यांनी यावेळी केली.
“खांबाचे काम झाल्यानंतर त्याचे कोअर तपासले जातात. या तपासणीत या खांबाचा वरचा भाग मजबूत नसल्याचे आढळल्याने तो काढण्यात आला आहे. काम करताना सिमेंट अथवा वाळूमध्ये पाणी जास्त असल्यास असा प्रकार घडू शकतो.” – श्रीनिवास बोनाला, प्रकल्प विभाग





