Agriculture Minister : पुण्याला ३० वर्षांनी मिळाले कृषिमंत्रिपद; १९९५ मध्ये शिवसेनेच्या ‘या’ नेत्याकडे होती जबाबदारी

पुणे : तब्बल तीन दशकांनंतर पुणे जिल्ह्याला कृषिमंत्रिपदाची संधी मिळाली आहे. माणिकराव कोकाटे यांच्या विधान भवनातील ऑनलाइन रम्मी खेळण्याच्या वादग्रस्त प्रकरणानंतर त्यांच्याकडून कृषी खाते काढून घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू सहकारी असलेल्या भरणे यांच्याकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची आणि कृषी खात्याची प्रतिमा सुधारण्याची अपेक्षा आहे. दत्तात्रय भरणे यांच्या नियुक्तीमुळे पुण्याला ३० वर्षांनी कृषिमंत्रिपद मिळाले आहे. पुण्याचे माजी कृषिमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शशिकांत सुतार यांनी १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये कृषिमंत्री म्हणून पुण्याचे प्रतिनिधित्व केले होते.
कोण आहेत दत्तात्रय भरणे?
दत्तात्रय विठोबा भरणे हे इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे तिसऱ्यांदा निवडून आलेले आमदार आणि अजित पवार यांचे विश्वासू सहकारी आहेत. १ जून १९६८ रोजी इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भरणे यांनी नारायणदास रामदास हायस्कूल, इंदापूर येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आणि बारामतीच्या टी.सी. कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी (बी.कॉम.) मिळवली.
त्यांनी १९९२ मध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून सहकारी क्षेत्रात पदार्पण केले आणि १९९६ मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (PDCC) संचालक झाले. २००१-००२ मध्ये ते या बँकेचे अध्यक्ष झाले, तर २००२-०७ दरम्यान साखर कारखान्याचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले.
भरणे यांनी २००९ मध्ये इंदापूरमधून विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, त्यांनी खचून न जाता २०१२-१४ दरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवले. २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा इंदापूरमधून आमदारकी जिंकली आणि २०१९ व २०२४ मध्येही त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करत विजयाची हॅटट्रिक साधली.
महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी ३० डिसेंबर २०१९ रोजी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि सार्वजनिक बांधकाम, मृद व जलसंधारण, वन, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय आणि सामान्य प्रशासन खात्यांची जबाबदारी सांभाळली. महायुती सरकारमध्ये त्यांना क्रीडा आणि युवक कल्याण खाते मिळाले, आणि आता त्यांच्याकडे कृषिमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आहे.
शशिकांत सुतार पुण्याचे माजी कृषिमंत्री
दत्तात्रय भरणे यांच्या नियुक्तीमुळे पुण्याला ३० वर्षांनी कृषिमंत्रिपद मिळाले आहे. यापूर्वी १९९५ मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शशिकांत सुतार यांनी शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये कृषिमंत्री म्हणून पुण्याचे प्रतिनिधित्व केले होते. सुतार यांचा राजकीय प्रवास खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. कोथरूडमध्ये सायकलवर जेवणाचे डबे पोहोचवणारा आणि भाजी विकणारा सामान्य माणूस बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेत दाखल झाला आणि नगरसेवक, आमदार ते राज्याचे मंत्री असा थक्क करणारा प्रवास त्यांनी केला.





