Kalas Water Crisis : कालवा असूनही शेती कोरडी! कृषिमंत्र्यांच्या घरासमोर ‘बोंबाबोंब’ आंदोलनाचा इशारा; शेतकरी आक्रमक
Kalas Water Crisis : पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ; प्रशासनाने ४ दिवसांत पाणी न दिल्यास 'बोंबाबोंब' आंदोलनाचा पवित्रा.

Kalas Water Crisis – कळस परिसरात वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेने शेती पिकांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. कालव्याचे आवर्तन संपून दीड महिना उलटला तरी नवीन आवर्तन सुरू न झाल्याने उभी पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत करपून चालली आहेत. या पाणी टंचाईकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, येत्या आठवडाभरात पाणी न मिळाल्यास पिके जळून खाक होतील, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रात असूनही कळस परिसरातील शेतकऱ्यांच्या नशिबी पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, कालव्यापासून अवघ्या २० फुटांवर असलेल्या शेतातील पिकांचाही पाण्याअभावी कोळसा झाला आहे. कालव्याचे पाणी नियमित मिळत नसल्याने शेतीचे वाळवंट झाले असून, वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने जमिनीला भेगा पडल्या आहेत.
प्रशासनाकडून शेतकऱ्यांचा छळ?
“कालव्याचे पाणी फक्त पाहण्यासाठी आहे की शेतीसाठी?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. एकीकडे पाणी मिळत नाही, तर दुसरीकडे पाटबंधारे विभाग पाणी चोरी रोखण्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचे पाईप फोडणे किंवा वीजपुरवठा खंडित करणे, यांसारख्या कारवाया करून शेतकऱ्यांचा छळ करत असल्याची भावना लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आहे.
बोंबाबोंब आंदोलनाचा इशारा
बळीराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय गावडे यांनी प्रशासनाच्या मनमानी कारभारावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “वर्षभर कष्ट करून वाढवलेले पीक करपताना पाहून बळीराजा हतबल झाला आहे. पाटबंधारे विभागाचा मनमानी कारभार व लोकप्रतिनीधींचे दुर्लक्षाने कृषिमंत्र्यांच्या तालुक्यातच ही अवस्था असणे दुर्दैवी आहे. येत्या ४ ते ५ दिवसांत जर कालव्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचले नाही, तर कृषिमंत्र्यांच्या घरासमोर ‘बोंबाबोंब आंदोलन’ करण्यात येईल,” असा इशारा गावडे यांनी दिला आहे.





