Pune : सिंहगड रोडवर टोळक्याचा धुडगूस

पुणे – सिंहगड रस्त्यावरील वडगाव कॅनाल रोड, गोयलगंगा परिसर आणि सिंहगड पुलाखालील परिसरात शनिवारी (दि.२८) पहाटे चार-पाच जणांच्या टोळक्याने वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. या घटनेत तब्बल १७ वाहनांचे नुकसान झाले आहे. सिंहगड रोड पोलीस, गुन्हा शाखा आरोपींचा शोध घेत आहे.
पहाटे या टोळक्याने चारचाकी, दुचाकी वाहनांना लक्ष्य करत तोडफोड केली. काही वाहनांची काच फोडली, तर काहींचे आरसे, बंपर व हेडलाईटची मोडतोड केली.परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस तपास करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
वढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या तोडफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे, असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमकी कोणत्या कारणातून ही घटना घडली हे स्पष्ट होवू शकले नाही. दारुच्या नशेत किंवा दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी हे कृत्य केल्याचे दिसून येते.
‘सिंहगड रस्ता परिसरातील तीन ठिकाणी वाहनांची तोडफोड झाली आहे. याप्रकरणातील आरोपींना लवकरच अटक केली जाईल.’ – दिलीप दाईंगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस ठाणे)





