Pune Ganeshotsav: तोरणे, मोत्यांच्या माळा अन् झुंबरं… गणरायाच्या स्वागतासाठी पुणेकरांची बाजारात तुफान गर्दी
Pune Ganeshotsav: महागाईचे सावट असूनही रास्ता पेठसह मध्यवर्ती बाजारपेठा गजबजल्या; आगामी दिवसांत खरेदीला आणखी वेग येण्याचा अंदाज

Pune Ganeshotsav – लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने पुणे शहरातील बाजारपेठा गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गजबजल्या आहेत. घरगुती गणपतीच्या सजावटीसाठी आवश्यक असलेल्या तोरण, मोत्यांच्या माळा, कागदी फुले, झुंबरसह विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू तसेच हरतालिकेच्या पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिक बाजारपेठांमध्ये गर्दी करीत आहेत.
मात्र, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विविध वस्तूंच्या दरात वाढ झाल्याने गणेशोत्सवाच्या खरेदीवर महागाईचे सावट असल्याचे चित्र आहे. गणेशमूर्तींच्या आगमनापूर्वी घराची सजावट करण्यासाठी नागरिकांकडून विविध प्रकारच्या तोरणांना मोठी मागणी आहे. साध्या तोरणापासून आकर्षक मोती, फुले आणि विविध डिझाइनच्या तोरणांपर्यंत अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत.
त्यानुसार तोरणांच्या किमती साधारणतः १०० रुपयांपासून १ हजार ४०० रुपयांपर्यंत आहेत. घराच्या सजावटीसाठी मोत्यांच्या माळा, कागदी फुले आणि झुंबरांनाही ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.गणेशोत्सवाच्या काळात येणाऱ्या हरतालिका पूजेसाठी आवश्यक साहित्याच्या खरेदीलाही सुरुवात झाली आहे. बाजारात हरतालिकेच्या मूर्ती किंवा जोड्यांची विक्री होत असून, त्यांची किंमत सुमारे ६० रुपये जोडी आहे.
पूजेसाठी लागणाऱ्या नारळाच्या दरातही वाढ झाली असून, सध्या नारळाचा भाव सुमारे ५० रुपये असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. यंदा वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांना बजेटचा विचार करून खरेदी करावी लागत आहे. तरीही गणरायाच्या स्वागतासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यास नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
“तोरण, मोत्यांच्या माळा, हरतालिका आदींच्या खरेदीसाठी ग्राहक बाजारात दाखल होत आहेत. गणेशोत्सव जवळ आल्याने पुढील काही दिवसांत खरेदीला आणखी वेग येण्याची अपेक्षा आहे. सध्या महागाइचे सावट असले तरी नागरिक गर्दी करीत आहेत.”
– नितीन गायकवाड, व्यावसायिक, रास्ता पेठ, पुणे





