Bhausaheb Rangari Ganpati: श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा ऐतिहासिक देखावा! ‘श्रीगणेश सुवर्णधाम’ पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी होणार
Bhausaheb Rangari Ganpati: 'श्रीगणेश सुवर्णधाम' देखाव्यातून मिळणार संस्कारांचा संदेश; उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती

Bhausaheb Rangari Ganpati – श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून यावर्षीही धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावर्षीच्या उत्सवात श्रीगणेश सुवर्णधाम या संकल्पनेवर आधारित आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. गणेश आणि कार्तिकेय यांच्यात पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याची स्पर्धा झाली. मात्र, श्रीगणेशांनी आई-वडिलांनाच पृथ्वी मानून त्यांची पूजा केली,
या कथेतून आई-वडिलांचे महत्त्व आणि संस्कारांचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी माहिती ट्रस्टचे उत्सवप्रमूख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना पद्मविभूषण हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुनीत बालन म्हणाले की, दहा दिवसांच्या गणेशोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांसह इच्छिक अभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज सकाळी पाच ते आठ या वेळेत गणेशयाग होणार आहे. आगमन मिरवणुकीत आठ ते नऊ ढोल-ताशा पथके, मर्दानी खेळ, शंखवादक असतील. सकाळी ०८:१५ वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल. दुपारी १२:३० वाजता लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याचे तसेच १६ सप्टेंबरला सकाळी ११:०० वाजता तब्बल ११ हजार विद्यार्थी शाळांमधून ऑनलाइन पद्धतीने गणेशस्तोत्राचे पठण करणार असल्याची माहितीही बालन यांनी दिली.
एशिया बुक ऑफ रेकॉर्ड…
यावर्षी ट्रस्टतर्फे महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. तब्बल ११ हजार नागरिकांना चष्म्यांचे वाटप तसेच, दंत तपासणी, रक्ताच्या विविध चाचण्याही करण्यात येणार आहेत. तपासण्यांचे अहवाल भाविकांना त्यांच्या मोबाइलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यावर्षी एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचा प्रयत्न या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे.
पढेंगे तो बढेंगे…
ट्रस्टतर्फे यावर्षी राबविण्यात येणाऱ्या पढेंगे तो बढेंगे, या उपक्रमांतर्गत नागरिकांना पुस्तके दान करण्याचे आवाहन करण्यात आले असून आतापर्यंत १५ हजार पुस्तके जमा झाली आहेत. ही पुस्तके ग्रामीण भागातील ग्रंथालयांना देण्यात येणार आहेत. याशिवाय जन्माचा श्रीगणेशा या उपक्रमातून कमला नेहरू रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुला-मुलींना वेलकम किट देण्यात येणार आहे. मुलीच्या जन्मासाठी ट्रस्टकडून एक हजार एक रुपयांची मदतही केली जाणार आहे.






