Pune Ganesh Visarjan 2025 | गणेशोत्सवाची झगमग आणि व्यवस्थेची अडखळ! विसर्जन रस्त्यांवर काय घडलं?

प्रभात वृत्तसेवा
पुणे – पौराणिक व समाजजनजागृती करणाऱ्या देखाव्यांसह विद्युत रोषणाई, आकर्षक फुलांची सजावट केलेल्या रथात विराजमान झालेल्या बाप्पाची मिरवणूक डिजेच्या दणदणाटात सुरू झाली. मराठी, हिंदी गाण्यांवर तरूणाई थिरकली तर गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजीत न.चिं. केळकर रस्त्यावरील गणेश मंडळांनी मोठ्या उत्साहात, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष करत गणरायाला निरोप दिला.
यावर्षी या मार्गावर तब्बल १०९ गणेश मंडळांनी सहभाग घेतला. गतवर्षीपेक्षा यंदा आठ मंडळे वाढली. तर, या मार्गावरील मिरवणूक जवळपास २७ तास चालली. गतवर्षी २३ तास ३० मिनिटे मिरवणूक चालली. यावेळी फोकस लाइट आणि लेझरचा अतिलखलखाट, बहुतांश मंडळांनी साउंडचा डोंगर (डीजे) उभारल्याने केळकर रस्ता डिजेच्या दणदणाटात हादरून गेला. शनिवारी (दि. ६) दुपारी एक वाजता गजानन मित्र मंडळाने ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुकीने केळकर रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली.
साईनाथ मित्र मंडळाचा अहिल्यादेवी होळकर प्रतिमा चित्ररथ, जागृती मंडळाने पांडुरंग प्रतिमा, वंदे मातरम मित्र मंडळाने पुण्येश्वर प्रतिमा, क्रांतीरत्न चंद्रशेखर आझाद मंडळाने शिवाजी महाराज प्रतिमा, विधायक मित्र मंडळाने अमली पदार्थ मुक्तीकरण संदेश जनजगृती, श्री कर्म प्रयत्नेश्वर तरूण मंडळाने अष्टविनायक, बुधवार चौक मंडळ वैष्णवदेवी रथ असे विविध आकर्षक देखावे भाविकांचे लक्ष वेधले.
केळकर मार्गावरील नारायण पेठ पोलीस चौकीसमोरून दुपारी साडेतीन वाजता शेवटचे सम्राट मित्र मंडळ पुढे मार्गस्थ झाले. यावेळी पुणे पोलीस विघ्नहर्त न्यासतर्फे श्रेया कोककुल-शाळीग्राम आणि अॅड. उज्वला झेंडे, रोहित यवतकर, आशिष देसाई, गणेश नलावडे, वर्षा तांबोळी, वैभव रोकडे आदींनी गणेश विजर्सन मिरवणुक मार्गावर मंडळांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
– यंदा डिजेचा दणदणात अधिक
– लाईट्स आणि लेझरचाही वापर
– पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
– डिजेमुळे तरूणाईची या रोडला अधिक पसंती
– पौराणिक देखावे आणि फुलांची सजावटींवर भर
वेळ पाळलीच नाही…
केळकर रस्त्यावर दुपारी एक वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. पहिल्या तासाभरात तिन मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली. त्यानंतर तीन तास एकही मंडळ आले नाही. तर रात्री नऊ वाजेपर्यंत केवळ १० आणि रात्री १२ वाजेपर्यंत केवळ १५ मंडळे नारायण पेठ पोलीस चौकीपासून पुढे मार्गस्थ झाली. त्यानंतर डिजेचा दणदणाट बंद झाला आणि मंडळांचा वेग मंदावला. सकाळी सहा वाजेपर्यंत २४ मंडळे मार्गस्थ झाले. त्यानंतर डिजेचा पुन्हा दणदणाट सुरू झाला आणि दुपारी बारा वाजेपर्यंत ७० मंडळे मार्गस्थ झाली. त्यानंतर तब्बल ३९ मंडळाना दुपारचे चार वाजले.
चार तासांचा वेळ अधिक..
न. चि. केळकर रस्त्यावरुन येणार्या गणेश मंडळांची संख्या यावर्षी वाढलेली दिसून आली. गतवर्षी या रस्त्याने १०१ मंडळे विसर्जनासाठी मार्गस्थ झालेले होते. यावर्षी त्या मंडळांमध्ये आठ मंडळांची भर पडली असून यावर्षी तब्बल १०९ गणेश मंडळे मार्गस्थ झाली आहेत. मात्र, गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुक १२च्या सुमारास संपलेली होती. यावर्षी मात्र चार तास मिरवणूक लांबली.
या रस्त्याने रास्ता पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, शिवाजीनगर, गोखलेनगर आदि भागातून गणेश मंडळांनी केळकर रोडने विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी मंडळे आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे पहायला मिळाले. तर पोलिसांचे नियोजनही कोलमडल्याचे दिसून आले.





