Pune News | मानाच्या गणपती मंडळांचा निर्धार ; तीन तास आधी विसर्जन मिरवणूक संपवणार

प्रभात वृत्तसेवा
पुणे – यंदा तीन तास आधी विसर्जन मिरवणूक संपवण्याचा निर्धार मानाच्या पाच गणपती मंडळांनी केला आहे. मिरवणूक वेळे आधी संपवण्यासाठी चौकांतील ढोल-ताशा पथकांचे स्थिर वादन आणि आवर्तन सादर करण्याच्या वेळा मंडळांनी कमी केल्या आहेत. याशिवाय कोणत्या चौकात किती वाजेपर्यंत पोहोचायचे याचे मायक्रो प्लॅनिंग केले असून आम्ही त्याचे पालन करू, असे आश्वासन पाचही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिले.
ढोल वादनाला अवाजवी महत्त्व दिले जात असल्याची कबुली पदाधिकाऱ्यांनी दिली. मात्र, यात पुढच्या वर्षी बदल झाल्याचे दिसेल, असा दावाही या पदाधिकाऱ्यांनी केला.मानाच्या पाच मंडळांच्या पदाधिकार्यांनी टिळकवाड्यातील लोकमान्य सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी श्री कसबा गणपतीचे श्रीकांत शेटे, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, प्रशांत टिकार, गुरूजी तालीम मंडळाचे पृथ्वीराज परदेशी, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, नितीन पंडित, केसरीवाडा गणेशोत्सवाचे अनिल सकपाळ आदी उपस्थित होते.
मिरवणुकीला नेमका उशीर का होतो, त्याच्या कारणांचा मंडळातील प्रमुखांनी अभ्यास केला आहे. त्यानुसार वादन, पथकातील क्रम, सहभागी संस्था, संघटना यांचा क्रम, कोणत्या चौकात किती वेळ वादन करायचे, या सगळ्या गोष्टींचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार विसर्जन मिरवणूक किमान तीन तास आधी संपवू, असा दावा या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.
गेल्या आठवडाभरापासून मानाच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा याबाबत अभ्यास आणि विचार सुरू होता. त्यानंतर उपरोक्त उपाययोजना केली आहे ज्या ठिकाणी मिरवणूक रेंगाळेल, त्या ठिकाणी रस्ता रिकामा करून देण्याची विनंती पोलिसांना केली आहे. जेणेकरून मिरवणूक रेंगाळून न राहता पुढे जाईल, असे मंडळांच्या पदाधिकार्यांनी स्पष्ट केले.
“उत्सवात ढोलवादनाला अवाजवी महत्त्व दिले जात असल्याचे काही वर्षांत लक्षात आले आहे. मात्र, पुढच्यावर्षी पासून पर्याय निवडून, वेगळ्या पर्यायांचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे पुढच्यावर्षी सकारात्मक आणि चांगला बदल पुणेकरांना दिसून येईल.”
– श्रीकांत शेटे, अध्यक्ष, कसबा गणपती.





