Pune News | गणेश विसर्जन मिरवणुकीचा मान यंदाही आयुक्तांना

प्रभात वृत्तसेवा
पुणे – वैभवशाली आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक सुरूवातीचा मान सलग चौथ्या वर्षी प्रशासक म्हणून महापालिका आयुक्तांना मिळणार आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते मानाचा पहिला कसबा गणपतीला पुष्पहार अर्पण करून मिरवणूकीला सुरूवात केली जाते. पोलिसांच्या सूचनेनुसार यंदा सकाळी साडेनऊ वाजताच मिरवणूकीला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
या मिरवणुकीची सुरूवात दरवर्षी महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळयास पुष्पहार अर्पण करून नंतर पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीला महापालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण केल्यानंतर सुरू केली जाते. हा मान दरवर्षी महापौरांना असतो.
मात्र, मार्च २०२२ पासून महापालिकेच्या निवडणूकाच झालेल्या नसल्याने महापालिका आयुक्तच प्रशासक म्हणून पालिकेचे कामकाज पाहतात. त्यामुळे, आयुक्तांच्या हस्ते मानाच्या पहिल्या गणपतीला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक सुरू केली जाते. यंदाही हा मान सलग चौथ्या वर्षी महापालिका आयुक्तांना मिळाला आहे.
टिळक चौकात स्वागत कमान..
महापालिकेकडून या वर्षीही टिळक चौकात स्वागत कक्ष उभारण्यात आला आहे. या कक्षात २४ तास अधिकारी नियुक्त असणार असून शहरातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या रस्त्यावरून आलेल्या मिरवणूकांचे स्वागत या ठिकाणी केले जाते. तसेच मानाच्या गणपतींच्या मिरवणूकीची सांगताही या ठिकाणी झाल्यानंतर पुढे हे गणपती विसर्जनासाठी जातात. महापालिका आयुक्तांसह, अतिरिक्त आयुक्तही या ठिकाणी असणार आहेत.





