Pune Ganesh Visarjan 2025 | पुण्यात विसर्जन मिरवणुकीत उत्साह शिगेला; गर्दीच्या विस्कळीत नियोजनाने पोलिसांची चांगलीच तारांबळ

पुणे : गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवसाच्या विसर्जन मिरवणुकीने शनिवारी पुणेकरांचा उत्साह शिगेला पोहोचला. “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या दणदणाटात वातावरण भारावून गेले. मात्र या आनंदसोहळ्यात पोलिसांनी केलेले नियोजन कोलमडल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. प्रचंड गर्दी, ढोल-ताशा पथकांची दादागिरी आणि काही नवख्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शहरात कायदा-सुव्यवस्थेला गालबोट लागेल अशी स्थिती निर्माण झाली.
टिळक रस्ता- अलका चौकात गोंधळ
टिळक रस्त्यावर अलका चौकात संध्याकाळी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. हजारोंच्या संख्येने भाविक गर्दीत अडकून पडले. इतकी झुंबड उडाली की अनेक ठिकाणी नागरिकांच्या चपलांचा अक्षरशः खच पडला होता. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्त्यावर सायंकाळी सहा नंतर गर्दी शिगेला पोहोचली. गर्दीत सापडलेल्यांना श्वास घेणेही अवघड झाले होते.
बॅरिकेड्समुळे नागरिक अडचणीत
पोलीसांनी सुरक्षेच्या कारणास्तव रस्ते बांबूच्या बॅरिकेड्सने बंद केले होते. परंतु त्यामुळे नागरिकांना गर्दीतून बाहेर पडणे किंवा रस्ता ओलांडणे मुश्किल झाले. यामुळे अस्वस्थता पसरली आणि काही ठिकाणी पोलिसांना गर्दी नियंत्रित करताना मोठी कसरत करावी लागली.
अरुण मित्र मंडळाचा बेलबाग चौकात गोंधळ
बेलबाग चौकात अरुण मित्र मंडळाने पोलिसांच्या वारंवार सूचनांकडे दुर्लक्ष केले. नियोजित मार्गाऐवजी मिरवणुकीचा रथ थेट चौकात आणण्यात आला. पोलिसांना अजिबात न जुमानता मंडळ कार्यकर्त्यांनी मिरवणुकीला जबरदस्तीने पुढे ढकलले. यावेळी महिला पोलीस अधिकारी रथाच्या ट्रॅक्टरखाली सापडता सापडता थोडक्यात बचावल्या.
माजी आमदाराचा वाद
गर्दी आणि गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एका माजी आमदाराने पोलिसांशी वाद घातल्याने परिस्थिती आणखी तणावपूर्ण झाली. त्यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली.
एकूणच, पुण्यातील विसर्जन मिरवणूक उत्साह आणि भक्तीभावाने रंगली असली, तरी गर्दीच्या वाईट व्यवस्थापनामुळे पोलिसांची गोंधळलेली भूमिका आणि मंडळांच्या दादागिरीने सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.





