Pune: एकतानगरीत तीन सोसायट्यांत पुराचे पाणी

पुणे – खडकवासला धरणातून ३५ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केल्यानंतर एकतानगरी येथील द्वारका सोसायटीच्या पार्किंगसह शाम सुंदर आणि जलपूजन या सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. मुठा नदीला जोडणाऱ्या नाल्यातून बॅकवाॅटर आल्याने या सोसायट्यांमध्ये हे पाणी घुसले.
त्यानंतर महावितरणकडून तत्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. याशिवाय सनसिटी रस्त्यावरील शिवपुष्प सोसायटीच्या एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये नाल्याचे पाणी घुसले आहे. कसबा पेठेत एका घराची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून सायंकाळी उशिरा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला. या भागात ३३ हजार क्यूसेक पाणी सोडल्यानंतर पाणी घुसते. त्यामुळे ३५ हजार क्युसेकनंतर पाण्याचा प्रवाह नाल्याच्या वाहिन्यांमधून विरुद्ध दिशेने आल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यानंतर तत्काळ या नागरिकांना बाहेर काढण्यात आले.
या ठिकाणी महापालिकेच्या सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकासह, पोलीस आणि अग्निशमन दल, तसेच महावितरणचे कर्मचारी उपस्थित असून, त्यांच्याकडून पूरस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. क्षेत्रीय अधिकारी प्रज्ञा पवार यांच्यासह कर्मचाऱ्यांचे पथक या ठिकाणी कार्यरत आहेत. तर या नागरिकांसाठी महापालिकेकडून जवळच असलेल्या बॅडमिंटन हाॅलच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागरिकांमध्ये नाराजी
मागील वर्षाच्या तुलनेत एकतानगरीमध्ये या वर्षाच्या पुराची तीव्रता कमी असली, तरी नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. खडकवासला धरणसाखळीतील धरणांमध्ये मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होता. त्यामुळे सोमवारीच खडकवासला धरणातून पाणी सोडणे आवश्यक होते.
त्याबाबत नागरिकांकडून मागणी केली जात होती, तरीही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडले नाही. त्यानंतर मंगळवारी एकाच दिवशी ३५ हजार क्युसेक विसर्ग केला. रात्रीच्या वेळी हे पाणी सोडल्यामुळे काही सोसायट्यांमधील नागरिकांची अडचण झाली आहे. पाटबंधारे विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे ही पूरस्थिती उद्भवत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली.





