pune : सर्वधर्मीय अभिवादन दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद

वारीतून राष्ट्रीय एकात्मता आणि मानवतेचा संदेश
पुणे – आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर नाना पेठ आणि भवानी पेठ परिसरात आयोजित करण्यात आलेल्या सर्वधर्मीय अभिवादन दिंडीला शुक्रवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वारकऱ्यांसह मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख आणि विविध धर्मीय प्रतिनिधींनी या दिंडीत सहभागी होत मानवता, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला.
शिवमहोत्सव समिती, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर मंडळ, रिझवानी मशिद, दि मुस्लिम को-ऑप. बँक, सूफी वारकरी विचारमंच, पी. ए. इनामदार विद्यापीठ आणि समविचारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि भारतीय संविधानाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलशेठ मणियार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
नाना पेठेतील साखळीपीर तालीम येथून सुरू झालेली दिंडी पारशी अग्यारी, निवडुंगा विठोबा मंदिर, धान्य बाजार, पानसरे धर्मशाळा, गूळ आळी, बुरूड पूल, अंगरशा बाबा दर्गा मार्गे गंज पेठेतील रिझवानी मशिद येथे संपन्न झाली.
मार्गात नागरिकांनी दिंडीचे स्वागत केले. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गुलाबपुष्प देऊन सहभागींचे स्वागत करण्यात आले, तसेच व्हेज बिर्याणी आणि शिरखुर्म्याचा प्रसादही देण्यात आला.
हभप. विकास लवांडे, फादर डॉ. अविनाश वाघमारे, भंते हर्षवर्धन, सूफी वारकरी विचारमंचचे उमर शरीफ यांच्यासह विविध धर्मीय मान्यवर दिंडीत सहभागी झाले होते यांनी सर्वधर्मीय अभिवादन दिंडीच्या संकल्पनेमागील भूमिका स्पष्ट करून या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक रवींद्र माळवदकर, शिवानी माळवदकर, शिवराज माळवदकर यांनी केले





