Pune Dust Pollution: पुणेकरांचा श्वास गुदमरला! बांधकामे आणि रिडेव्हलपमेंटच्या धुळीमुळे शहरात आरोग्याचे मोठे संकट
Pune Dust Pollution: पुणे शहरात वेगाने सुरू असलेल्या रिडेव्हलपमेंट प्रकल्पांमुळे धुळीचे साम्राज्य; ट्रक आणि डंपरमधून माती सांडत असल्याने हवेतील प्रदूषण वाढले.

Pune Dust Pollution – पुणे शहरात वेगाने सुरू असलेल्या बांधकामे आणि रिडेव्हलपमेंट प्रकल्पांमुळे नागरिकांना धुळीच्या प्रदूषणाचा गंभीर फटका बसत आहे. राडारोडा वाहून नेणारी ट्रक, डंपरसारखी अवजड वाहने अयोग्य प्रकारे माल वाहून नेताना कॉंक्रिट, राबिट, माती झाकली जात नसल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धुळीचे प्रदूषण होते. तसेच, रस्त्यावर माती सांडते. परिणामी शहरातील अनेक भागांमध्ये धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होत आहेत.
या वाहनांतून येणारी धूळ मागील वाहनचालकांच्या नाकातोंडात गेल्याने नागरिकांना गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. पुणे शहरात सुरू असलेल्या विविध बांधकाम प्रकल्पांमधून निघणारा राडारोडा आणि सिमेंटची धूळ नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. राडारोडा वाहून नेणाऱ्या ट्रक आणि डंपरमधून मोठ्या प्रमाणात माती व कण रस्त्यावर सांडत असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना धुळीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी ही धूळ हवेत मिसळून प्रदूषणाची पातळी वाढवत आहे.
विशेषतः शहरातील रिडेव्हलपमेंट प्रकल्पांच्या परिसरात सिमेंट मिक्सर, काँक्रिट मिक्सिंग यंत्रणा आणि बांधकाम साहित्य हाताळताना निर्माण होणारी धूळ नागरिकांच्या श्वसनसंस्थेसाठी घातक ठरत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच दमा आणि ॲलर्जीग्रस्त रुग्णांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. नियमानुसार राडारोडा किंवा बांधकाम साहित्य वाहून नेणारी वाहने टारपॉलिनने पूर्णपणे झाकणे बंधनकारक आहे.
तसेच वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक माल भरू नये आणि बांधकामस्थळी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे संबंधितांची जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात या नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस, आरटीओ आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. शहराचा श्वास गुदमरविणाऱ्या धुळीच्या या संकटाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
संबंधित कायदे व नियम
केंद्रीय मोटार वाहन नियम (CMVR, 1989; २०१८ सुधारित) – मालवाहतुकीच्या वाहतुकीत सर्व माल बंद बॉडीमध्ये किंवा कंटेनरमध्येच वाहून न्यावा. खुल्या वाहतुकीची आवश्यकता असल्यास मालाचे योग्यरित्या झाकण (उदा. टारपॉलिन) करणे बंधनकारक आहे. तसेच सर्व मालवाहू वाहनांवर रिफ्लेक्टिव्ह टेप लावण्याची, इंधनाची देखभालीची नियमावली आहे. केंद्र सरकार निर्देशित धूळ नियंत्रण मार्गदर्शक (CPCB, २०१७) – बांधकाम/विघटन कचरा वाहतुकीसाठी दिशा-निर्देश नियमानुसार, हवेत उडणारे साहित्य जाड कापड, प्लास्टिक किंवा टारपॉलिनने झाकून वाहून न्यावे.






