अजित पवार : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याचा आढावा शिक्रापूर – ऐतिहासिक विजय विजयस्तंभाचे दर्शन घेण्यासाठी एक जानेवारी रोजी लाखोंचा जनसमुदाय येथे येत असतो, समाज बांधवांना सुविधा देण्यासाठी राज्य सरकार नेहमीच पुढाकार घेत असून निधीअभावी येथील कार्यक्रमाला कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एक जानेवारी रोजी पार पाडणाऱ्या शौर्यदिन विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा नुकताच उपमुख्यमंत्री पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके, प्रभारी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते, शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रमुख अतुल चव्हाण, कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, दीपक बनसोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे, शिक्रापूर पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे, जिल्हा उपाध्यक्ष महेश ढमढेरे, कोरेगाव भीमाचे सरपंच संदीप ढेरेंगे, पेरणेच्या सरपंच उषा वाळके उपस्थित होते. पवार म्हणाले की, कायदा, सुव्यवस्था, वाहतूक, आरोग्य यांसह मूलभूत गरजा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य सरकार नेहमी पुढाकार घेत असते. तसाच पुढाकार राज्य सरकारने घेतला आहे, यापूर्वी अनेक विभाग व अधिकाऱ्यांच्या बैठका झालेल्या आहेत, मी अधिवेशनात होतो. तेव्हा मुख्यमंत्र्यांची माझी चर्चा झाली असताना मी तेथे जाऊन आढावा घेईन, असे सांगितले होते. कार्यक्रमावेळी समाज बांधवांना सुविधा देण्याची जबाबदारी शासनाच्या विविध विभागांवर असून शासनाचे सर्व विभाग याबाबत जबाबदारी पार पडतात. जो निधी लागतो, त्यावर नुकतीच मुख्यमंत्र्यांची सही झाली असून तो निधी ताबडतोब वर्ग केला जाईल. निधीमुळे कोणती अडचण येणार नाही.