पुणे जिल्हा : इंद्रायणी नदीतील पाण्याला दुर्गंधी

कुरुळी-मोशी हद्दीत केटी बंधा-यातील स्थिती
चिंबळी – इंद्रायणी नदीवर कुरुळी-मोशी हद्दीत उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधा-यातील पाणी काळवंडलेले असून दुर्गंधी सुटली असल्याने प्रवाशांसह स्थानिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे.
कार्तिकी एकादशी व संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अवघ्या तीन ते चार दिवसांवर आला असल्याने राज्यभरातून लाखो भाविक आळंदी येथे दर्शनासाठी येत असल्याने वारकर्यांना स्नान करण्यासाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून इंद्रायणी नदीवर असलेल्या विविध ठिकाणच्या केटी बंधा-यात पाणी अडविले असल्याने इंद्रायणी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे.
या नदी पात्रात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील तळवडे-चिखली परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कुरुळी-मोशी हद्दीतील इंद्रायणी नदी पात्रातील जुन्या व नव्या पुलाखाली पाणी काळपट रंगाचे झाले .
मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असल्याने डासांचे प्रमाण वाढले असल्याने नदीकाठावरील परिसरात रोगराई वाढली असून सर्दी, खोकला ताप, डेंग्यू, मलेरिया सारखे आजार वाढत असून रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरबरा आदी पिकांवर यांचा परिणाम होणार असल्याचे बळीराजाचे म्हणणे आहे





