इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर हा बागायती तालुका म्हणून नावारूपाला आला आहे. कमी पाण्यात आदर्श शेती फुलवण्याची किमया बळीराजा करतो आहे. उसाची शेती, फळबागा यामध्ये इंदापूरचा शेतकरी आपला अव्वल दर्जा जिल्ह्यात नाही तर राज्यात टिकवून आहे. ज्वारी, बाजरी, मका या पिकापेक्षाही अधिक धान्य उत्पादक शेतकरी आता, भाजीपाला लागवडीकडे वळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
इंदापूर तालुक्यात उसाची शेती करणारा मोठा शेतकरी आहे; मात्र वर्षभर कष्ट घ्यायचे, ऊस पिकवाचा आणि या उसाला हमीभाव नसल्यामुळे वर्षभर केलेले कष्ट, घेतलेली मेहनत, केलेला खर्च हातात राहत नाही. त्यामुळे खर्या अर्थाने ऊस उत्पादक शेतकरी पिक बदलाची पद्धत लक्षात घेऊ लागला आहे. तीन सहकारी साखर कारखाने उसाचे गाळप इंदापूर तालुक्यामध्ये करत असतात; मात्र प्रत्येक वेळी प्रत्येक सीझनला शेतकर्यांना दरासंदर्भात मोठी आर्थिक हानी सोसावीच लागते. त्यातच धान्य पिकवले तर त्याही धान्याला हमीभाव नाही. त्यामुळे इंदापूर तालुक्यात धान्य कोठार असला तरी धान्यशेती करणारा शेतकरी आजही पाहिजे तसा समृद्ध झालेला नाही.
शेतकर्याला समृद्ध करण्यासाठी त्याला विविध पिकांची लागवड करावी लागणार आहे. यासाठीच कृषी विभागाकडून नवनवे प्रयोग केले जात आहेत. यामुळेच तालुक्यातील निमगाव केतकी, वरकुटे, काटी, बॅकवॉटर पट्टा तसेच नीरा नरसिंहपूर परिसर आता भाजीपाला पिकवणारा परिसर म्हणून पुढे आलेला आहे.
ताजा माल, ताजा पैसा
निमगाव केतकी, काटी परिसरातील भाजीपाला पुण्यासारख्या मोठ्या बाजारपेठेत आपला करिष्मा करून राहिला आहे. रोज शेतकरी आपल्या शेतातील ताजा भाजीपाला, पुणे, मुंबई येथे पाठवून ताजा पैसा निर्माण करत आहेत. ढोबळी मिरची, वांगी, कारले गवार, कांदा, मेथी व इतर पालेभाज्या इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत आहेत. भाजीपाला हा कमी दिवसात शेतामध्ये पिकतो, त्यामुळे त्याला लगेचच बाजारात मागणी असल्यामुळे, आर्थिक चलन शेतकर्यांचे चालू राहते. त्यामुळे जिल्ह्यात व राज्यात इतरत्र भाजीपाला महाग झाला तरी देखील, इंदापूर तालुक्यातील नागरिकांना मात्र स्वस्तात भाजीपाला उपलब्ध होत आहे.
यंदा रब्बीत जिल्ह्यात तब्बल शेकडो हेक्टर क्षेत्रात शेतकर्यांनी भाजीपाला लागवड केली आहे. जिल्ह्यात धान पीक प्रामुख्याने घेतले जात असून, भाजीपाला लागवड शेतकरी आपल्यापुरतीच न करता, आपल्या शेतीत भाजीपाला पिकून आपले आर्थिक उत्पन्न कसे वाढवता येईल याकडे लक्ष देत आहे. याच भाजीपाला उत्पन्नामुळे, तालुक्यातील शेतकर्यांना बारमाही उत्पन्न भाजीपाला शेती मिळवून देत आहे.
– साहेबराव मोहिते, प्रगतशील शेतकरी